Pimpri Chinchwad Crime News : पुण्यात पिंपरी-चिंचवड येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रियकर दुसऱ्या मुलीसोबत फिरत असून प्रियसीला टाळत होता. याचा जाब विचारल्यास तो मित्रांसमोरच मारहाण करत असल्याने त्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून एमबीएचे शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीने हॉस्टेलमध्ये पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना हिंजवडी येथील आयआयएमएस महाविद्यालयाच्या मुलींच्या डेल्टा हॉस्टेलमध्ये ३ ऑक्टोबर २०२३ रोजी घडली असून मुलीच्या वडिलांनी रविवारी (दि ४) तक्रार दिल्यावर या प्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुडीया कुमारी (वय २५) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. तर अश्वनी भारद्वाज (रा. रंजित सिंह, डुमरी, लखीसराय, बिहार) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. याबाबत मयत मुलीचे वडिल भोलासिंग परमात्मा प्रसाद सिंग (वय ४८ रा. मसत्थुता-बाड, जि. पटना बिहार) यांनी हींजवडी पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुडीया कुमारी ही हिंजवडी येथील आयआयएमएस महाविद्यालयात एमबीएचे शिक्षण घेत होती. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून गुडिया आणि अश्वनी यांचे प्रेमसंबंध होते. पण काही कारणांमुळे त्यांच्यात दुरावा आला होता.
अश्वनी हा गुडियाला अपमानास्पद वागणूक देत होता. तसेच त्याचे दुसऱ्या एका मुलीशी सूत जुळले होते. तो तिच्या सोबत फिरत होता. ही बाब गुडिया हिला कळल्यावर तिने त्याला जाब विचारला. मात्र, अश्विनीने गुडिया हिला तिच्या मैत्रिणींसमोर मारहाण केली. हा प्रकार अनेक वेळा झाला. तो तिचा अपमान करीत होता. ‘तू मरून जा. मला काही फरक पडत नाही,’ असे तिला सारखे म्हणत होता. या प्रकाराला कंटाळून ३ ऑक्टोबर २०२३ रोजी हॉस्टेलमध्ये पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.
मृत तरुणीचे आई - वडील शेतकरी आहेत. त्यांना आपल्या मुलीने का आत्महत्या केली हे माहीत नव्हते. काही दिवसांपूर्वी मुलीने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचे त्यांना कळाले. त्यामुळे त्यांनी हिंजवडी ठाण्यात येऊन गुन्हा दाखल केला आहे. गुडियाने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात तिने आत्महत्या करण्याचे कारण लिहून ठेवले. चिठ्ठीनुसार हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या बाबत पोलिस उपनिरिक्षक तुकाराम शेळके म्हणाले, आम्ही आरोपीचा शोध घेत असून, लवकरच त्याला अटक करण्यात येईल.
संबंधित बातम्या