Pune yerwada rain viral video : पुणेकर कधी काय करतील काही सांगता येत नाही. पुणेकर त्यांच्या अतरंगी स्वभावासाठी जगात प्रसिद्ध आहेत. सध्या पुण्यात जोरदार पाऊस पडत असून रस्ते पाण्याने वाहू लागले आहे. या पावसाचा आनंद लुटतांना एका तरुणाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेक नेटकरी या तरुणाला पाहून थक्क झाले आहे. तर काहीनी या तरुणाने नितीन गडकरी यांचे जलवाहतूकीचे स्वप्न पूर्ण केले अशी खोचक टिप्पणी देखील केली.
पावसाच्या पाण्यात भिजण्याचा मोह सर्वांनाच होतो. काही जण धो धो कोसळणाऱ्या पावसात भिजतात तर काही जण रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यातून होडी सोडतात. पण पुण्यात व्हायरल झालेल्या व्हिडिओतील तरुणाने चक्क रस्त्यावर पाण्याचा आनंद लुटला.
येरवडा येथे काल जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे रस्तावर पाणी साचले रस्त्यांना ओढ्याचे रूप आले. या पाण्यातून पांढऱ्या रंगाच्या मोठ्या मॅटवर हा तरुण झोपला असून या वाहत्या पाण्यासह तो रस्त्यावरून इतर वाहनांसोबत प्रवास करतांना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून सर्वांनाच धक्का बसला असून तरुण पाण्यातून जात असतांना हाताने रस्त्यावरून जाणाऱ्या वाहणांना बाजूला होण्याचा इशारा करत आहे.
पावसाचा आनंद अशा पद्धतीने लुटणारा हा एकमेव असेल असे काहींनी सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहून कमेन्ट दिली आहे. तर एका व्यक्तिने तर नितीन गडकरी यांचे पुण्यातील जलवाहतुकीचे स्वप्न या तरुणाने पूर्ण केले आहे अशी कमेन्ट दिली आहे. यावर अनेकांनी हसून दाद दिली आहे. तर एकाने लिहिले, “जाशील येरवडा जेलमध्ये थेट” तर एकाने थेट गटारात जाशील असे देखील म्हटले आहे. तर एकाने पुण्यातील पोर्शे कार अपघाताचा संदर्भ देत, 'कारण त्याला माहीत आहे की एवढ्या पाण्यात पोर्शे काय येत नाय......' अशी कमेंट केली आहे. 'नका घालू वाद, हा आहे पुण्याचा नाद', अशी कमेंट एकाने केली आहे.