Yogesh Kadam : उद्धव ठाकरेंनी आपल्याच आमदारांना संपवण्याचं काम केलं; योगेश कदमांचा आरोप
Yogesh Kadam : दापोलीतील भगवा खाली उतरवण्याची हिंमत कुणाच्या बापात नाही, पुढच्या निवडणुकीत मीच आमदार होणार असल्याचा दावा योगेश कदम यांनी केला आहे.
Yogesh Kadam On Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खेडमध्ये काही दिवसांपूर्वीच जाहीर सभा घेतली होती. त्यानंतर आता शिंदे गटाकडून खेडमध्येच उत्तर सभा घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटाचे कोकणातील अनेक नेते सभेसाठी उपस्थित आहेत. यावेळी व्यासपीठावरून बोलताना खेडचे आमदार योगेश कदम यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार आरोप केले आहेत. उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख असताना ते आपल्याच पक्षातील आमदारांना संपवण्यासाठी निघाले होते, असा आरोप योगेश कदम यांनी केला आहे. त्यामुळं आता यावरून ठाकरे आणि शिंदे गटात राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.
ट्रेंडिंग न्यूज
खेडमधील सभेतून बोलताना शिंदे गटाचे आमदार योगेश कदम म्हणाले की, उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी कोकणाच्या विकासासाठी कोणताही निधी दिलेला नाही. कोकणात पूर आल्यानंतर उद्धव ठाकरे एकदाही कोकणात आले नाही, परंतु एकनाथ शिंदे यांनी कोकणातील पूरग्रस्तांसाठी दोन कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. इतकंच नाही तर उद्धव ठाकरेंनी आमच्या कुटुंबियांना राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांनी केला आहे.
कोकणातील विकासकामांसाठी मी अनेकदा उद्धव ठाकरेंना भेटण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी तब्बल सहा महिने मला भेटण्याची वेळच दिली नाही. रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंचा उजवा हात म्हणून काम केलं, परंतु त्यांच्याविरोधातच पक्षात राजकारण करण्यात आलं, असंही योगेश कदम यांनी म्हटलं आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत दापोलीतील भगवा खाली उतरवण्याची हिंमत कुणाच्या बापात नाहीये. आगामी निवडणुकीत मीच निवडून येणार असल्याचा दावा योगेश कदमांनी केला आहे.
कुणीही पैशांसाठी विकलं गेलेलं नाही- दीपक केसरकर
शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर औरंगाबाद आणि धाराशीव या दोन जिल्ह्यांचं नामांतर करण्यात आलं. आता त्याला केंद्रातील मोदी सरकारची संमती देखील मिळाली आहे. एकनाथ शिंदेंना कुणीही फसवलेलं नाही. कुणीही पैशांसाठी विकलं गेलेलं नाही. ठाकरे गटाकडून केवळ सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत राहिला म्हणूनच आम्हाला धनुष्यबाण मिळाल्याचं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.