यवतमाळ शहरात तेलाच्या पिंपावर बाहेरून अदानी कंपनीच्या प्रसिद्ध ‘फॉर्च्युन' ब्रँड खाद्यतेलाचे स्टिकर लावून आतमध्ये भेसळयुक्त तेलाची विक्री करणाऱ्या चार व्यापाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. या व्यापाऱ्यांकडून तब्बल ६८ पिंप भेसळयुक्त खाद्यतेल जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, शहरात ब्रँडेत खाद्यतेलाच्या नावाखाली बनावट खाद्यतेलाची विक्री झाली असल्याने अनेक ग्राहकांच्या पोटात आरोग्यास अपायकारक खाद्यतेल गेले असल्याने नागरिकांमध्ये व्यापाऱ्यांप्रती संताप व्यक्त केला जात आहे.
यवतमाळ शहरात काही किराणा व्यापारी भेसळयुक्त खाद्यतेलाच्या पिंपावर ‘फॉर्च्युन’ ब्रँडचे स्टिकर चिकटवून भेसळयुक्त तेलाची चढ्या भावाने विक्री करत असल्याची माहिती फॉर्च्युन कंपनीला देण्यात आली होती. या माहितीच्या आधारे कंपनीचे निरीक्षक यवतमाळमध्ये फॉर्च्युन ब्रँडच्या तेलाच्या विक्रीवर लक्ष ठेवून होते. कंपनीच्या अधिकृत डिलरकडून सोयाबीन, सूर्यफूल आणि शेंगदाणा तेलाची बाजारातून होणारी मागणी आणि होणारी विक्री यात बरीच तफावत आढळून येत होती.
फॉर्च्युन कंपनीच्या निरीक्षकांनी यवतमाळच्या बाजारपेठेत गुप्तपणे या संपूर्ण प्रकरणाचा तपशील गोळा केला होता. तसेच बाजारात फॉर्च्युन तेलाच्या नावाने भेसळयुक्त खाद्यतेलाची कुठे आणि किती विक्री केली जाते याचा तपशील गोळा करून यवतमाळ शहर पोलीसांपुढं ठेवला होता. कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या या माहितीच्या आधारे पोलिसांनी यवतमाळ शहरात मोठ्या प्रमाणावर धाडसत्र राबवले. यात यवतमाळ शहरातील व्यापारी उमेश दिलीप इसराणी (वय-४४; राहणार- सिँधी कँप, आर्णी रोड, यवतमाळ), अंकित प्रवीण कुमार राडिया (वय -२९; राहणार- गिरीजा नगर, यवतमाळ), अमित शाम लखानी (वय-२६; राहणार- शिवाजी नगर, यवतमाळ) दिलीप पारसमल ताथेड (वय-६५; राहणार-अग्रवाल ले-आउट, यवतमाळ) या व्यापाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. या सर्व दुकानदारांनी ठोक व्यापारी दिलीप तातेड यांच्याकडून भेसळयुक्त तेल खरेदी केल्याचे सांगितले. पोलिसांनी बनावट तेलाने भरलेले एकूण ६८ पिंप जप्त केले असून याची बाजारातील किंमत १ लाख ९३ हजार ५०० रुपये असल्याचे बोलले जाते.
नागपूर शहरात मे २०२४ मध्ये पोलिसांनी अशाच एका भेसळयुक्त खाद्यतेलाचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यावर धाड टाकली होती. या प्रकारानंतर यवतमाळमध्ये बनावट खाद्यतेलाच्या विक्रीवर कंपनीच्या निरीक्षकांनी लक्ष ठेवून होते, अशी माहिती आहे. यातील आरोपींनी फॉर्च्युन कंपनीच्या बनावट तेलाची ग्राहकांना विक्री करून ग्राहक तसेच फॉर्च्युन खाद्यतेल निर्मिती करणाऱ्या अदानी-विल्मर या कंपनीची फसवणूक केल्याने त्यांच्या विरुद्ध विविध कलमांन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.