Yashwantrao Chavan National Award : जो स्वमध्ये स्थित आहे तो स्वस्थ म्हणून लोकांना आरोग्य सक्षम करणे शासन आणि समाजाचे प्राथम्य असले पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्राला मद्यनीतीआणि तंबाखूमुक्तीची तातडीने गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक, वैद्यक क्षेत्रातील जागतिक कीर्तीचे संशोधक डॉ. अभय बंग यांनी यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारल्यानंतर केले.
सन २०२४ चा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. ते म्हणाले की, अत्यंत शालीन सुसंस्कृत आणि उत्कृष्ट प्रशासक असलेल्या स्व. यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या नावाचा यशवंतराव चव्हाण सेंटरचा प्रतिष्ठेचा पुरस्कार आम्हाला दिला जातोय, याचा आम्ही कृतज्ञतापूर्वक स्वीकार करतो.
ग्रामीण आदिवासी आरोग्यसेवेसाठी समर्पित जीवन व्यतीत करणाऱ्या डॉ. राणी आणि डॉ. अभय बंग यांच्या कार्याची दखल राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली जाते. त्यांच्या आदिवासी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी चव्हाण सेंटरतर्फे हा पुरस्कार यशवंतराव चव्हाण यांच्या ११२व्या जयंती कार्यक्रमात बंग दाम्पत्यास प्रदान करण्यात आला.
महात्मा गांधी फाउंडेशनला पुरस्कार अर्पण-
त्यावेळी ते म्हणाले की, ज्यांच्यामुळे आम्ही घडलो, समाजसेवेची प्रेरणा घेतली त्या महात्मा गांधी फाउंडेशनला त्यांच्या बुक डेपोच्या कार्यासाठी हा पुरस्कार अर्पण करीत आहोत. गडचिरोलीच्या आदिवासी भागात कामाला सुरुवात करताना अनेक प्रश्न दत्त म्हणून उभे राहिले. लोकांनी प्रश्न दिले आणि त्यावर संशोधन करत गेलो आणि आदिवासी समाजाचे आरोग्य सुधारण्याचे उपाय सापडले. याचे श्रेय आमचे नसून ते परिस्थिती आणि गडचिरोलीच्या आदिवासी लोकांचे आहे. उदाहरण म्हणून सांगता येईल दारूबंदीची मागणी जनतेमधून आली आणि शासनाकडे त्याचा पाठपुरावा केला, असे त्यांनी यावेळी नमूद केले.
गडचिरोली जिल्ह्यात विपूल खनिज संपत्ती असल्याने तेथे येऊ घातलेला स्टील प्लॅन्ट व त्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रश्नांचा त्यांनी उहापोह केला. आदिवासींच्या हिताचं रक्षण करून विकास व्हायला हवा असं प्रतिपादन त्यांनी केले.
पुरस्काराचे मानकरी ठरविण्यासाठी, विख्यात अणुशास्त्रज्ञ, डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय पुरस्कार निवड समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये SNDT विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. रूपा शाह, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, अर्थशास्त्रज्ञ डॉ. नरेंद्र जाधव, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नामवंत श्री. विवेक सावंत, आर्किटेक्ट आय.एम. काद्री हे सदस्य म्हणून काम पाहतात. रु. ५ लाख, मानपत्र, शाल व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यावेळी डॉ. अनिल काकोडकर यांनी पुरस्कारासंबंधीची माहिती दिली. डॉ. राणी आणि डॉ. अभय बंग यांचे न्यूमोनिया, बालमृत्यू संदर्भात केलेल्या संशोधनासाठी त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे, असे सांगून डॉ. काकोडकर यांनी डॉ. बंग पती-पत्नी यांनी गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात आरोग्यसेवेचा यशस्वी विस्तार केला,आदिवासी महिलांचे आरोग्य,नवजात बालकांची काळजी आणि समुपदेशन क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक केले.
अध्यक्षीय भाषणात यशवंतराव चव्हाण सेंटरचे अध्यक्ष श्री. शरदचंद्र पवार म्हणाले की, बंग दांपत्य आणि त्यांनी स्थापन केलेली ‘सर्च’ संस्था यांचं कार्य कौतुकास्पद आहे. गडचिरोलीसारख्या नक्षलप्रभावित भागात राहून जनतेला आरोग्याची सेवा पुरविणे याची चव्हाण सेंटरने नोंद घेतली, याचा मला आनंद आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाज सेवेचा वसा डॉ. राणी आणि डॉ. अभय बंग पुढे नेत आहेत, त्यासाठी त्यांची पुरस्कारासाठी केलेली निवड योग्य आहे. या डॉक्टर द्वयींनी चव्हाण सेंटरचा हा पुरस्कार स्वीकारला याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
डॉ. राणी बंग प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुरस्कार कार्यक्रमास प्रत्यक्ष उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्यांनी दृक्श्राव्य माध्यमाद्वारे पुरस्कारानिमित्त कृतज्ञता व्यक्त केली.सेंटरचे सरचिटणीस श्री. हेमंत टकले यांनी पुरस्काराच्या मानपत्राचे वाचन केले.
संबंधित बातम्या