Wrestler Vikram parkhi dies heart attack : पुण्याच्या मुळशी तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पैलवानाचा जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आल्याने मृत्यू झाला आहे. विक्रम पारखी असं मृत पैलवानाचे नाव आहे. मुळशी तालुक्यातील माण येथे ही घटना घडली. राष्ट्रीय खेळाडू पैलवान विक्रम पारखी यांचे आकस्मिक निधनाने माणसह मुळशीवर शोककळा पसरली आहे.
विक्रमचे येत्या १२ डिसेंबरला लग्न होणार होतं. घरात लग्नाची धामधून सुरू होती. मात्र त्याआधीच काळाने त्याच्यावर झडप घातली. विक्रमच्या मृत्यूने पारखी कुटुंबाच्या लग्नघरावर शोककळा पसरली आहे. विक्रमने कुमार महाराष्ट्र केसरीसह अनेक राष्ट्रीय पदकं आणि किताब पटकावले आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धेतही सहभाग घेतला होता.
मुळशीच्या माण येथील राष्ट्रीय खेळाडू कुमार महाराष्ट्र केसरी पैलवान विक्रम पारखी याचे आज सकाळी जिममध्ये व्यायाम करताना आकस्मिक निधन झाले. पैलवान विक्रम याला हृदयविकाराचा झटका आला. त्यामध्ये त्याची प्राणज्योत मालवली.
मुळशीतील माणगावचा भूमिपूत्र असलेल्या विक्रम पारखी याने कुमार महाराष्ट्र केसरी पदावर आपलं नाव कोरून मानाची गदा मिळवली होती. २८ नोव्हेंबर २०१४ ला वारजे येथे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आयोजित महाराष्ट्र राज्य कुमार अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत विक्रमने विजेतेपद पटकावले होते. हिंदकेसरी पैलवान अमोल बुचडे आणि विक्रम पारखीचे गुरू-शिष्याचे नाते होते.
रांची येथे पार पडलेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत त्याने कांस्य पदक मिळवले होते. मुळशीतल्या माले केसरी स्पर्धेचा विजेता बनवून माले केसरी किताब आणि गदा मिळवली होती. अशा अनेक नामांकित कुस्ती स्पर्धेत माण गावचे आणि मुळशी तालुक्याचे नाव विक्रमने उंचावले होते. विक्रम पारखी याच्या आकस्मिक जाण्याने पारखी कुटूंबासह मुळशीतील कुस्ती क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. विक्रमचे वडील शिवाजीराव पारखी हे निवृत्त माजी सैनिक असून त्यांनी १९९९ च्या कारगिल युद्धात पाकिस्तानच्या सैन्याशषी मुकाबला केला होता. त्यांनी अनेक वर्षे लष्करात राहून देशसेवा केल्यानंतर ते निवृत्त झाले होते.
संबंधित बातम्या