Dhule Zilla Parishad School News: धुळ्यातील साक्री तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत शालेय पोषण आहार अंतर्गत विद्या्र्थ्यांना दिल्या जाणाऱ्या चॉकलेटमध्ये चक्क जिवंत अळ्या आढळल्या. या प्रकारामुळे पालकांकडून संताप व्यक्त केला जात असून शासनाचा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
विद्यार्थ्यांमध्ये शाळा आणि अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी यासाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. शालेय पोषण आहार हा याच योजनेतील एक भाग आहे. शाळेच्या मधल्या सुट्टीत शालेय पोषण आहार दिला जातो. याआधी मुलांना धान्य दिले जात होते. मात्र, आता शाळेतच अन्न शिजवून दुपारच्या वेळी विद्यार्थ्यांना दिले जाते. यासोबत आता चॉकलेट देखील दिले जात आहेत. मात्र या चॉकलेटमध्ये अळ्या असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याआधी नंदुरबारतील शहादा तालुक्यामधील मुबारकपूर येथील अंगणवाडीत बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात आळ्या आढळल्याची घटना उघडकीस आली होती. या अंगणवाडीत बालकांना पोषण आहाराचे पाकीट वाटण्यात आले. मात्र, यात अळ्या आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर गावातील संरपंच यांनी तातडीने अंगणवाडीत जाऊन आहाराची तपासणी केली. त्यांनी त्वरीत याबाबत म्हसावद बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याशी संपर्क साधून अंगणवाडीतील प्रकार सांगितला. पोषण आहारात आळ्या आढळून आल्याची माहिती पालकांना मिळताच त्यांनी अंगणवाडीत धाव घेऊन संताप व्यक्त केला.
सांगलीतील पलूस येथील अंगणवाडीत मुलांना दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या पाकीटात मृत साप आढळून आल्याचा प्रकार समोर आला होता.या प्रकारामुळे मुलांच्या कुटुंबीयांनी चिंता व्यक्त केली. सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील मुलांना अंगणवाडी केंद्रांमध्ये माध्यान्ह भोजनाची पाकिटे मिळतात, ज्यात दाल-चिखडी असते. दरम्यान, सोमवारी (१ जुलै २०२४) इथल्या एका मुलाला देण्यात पॅकेटमध्ये मृत साप आढळल्याचे पालकांचे म्हणणे आहे. हा प्रकार नेमका काय आहे? याबाबत सविस्तर कळू शकलेले नाही.