worm found in cadbury : कॅडबरीत अळ्या निघाल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असेल. या बाबत अनेक वेळा कंपनीकडे तक्रारी देखील करण्यात आल्या आहेत. दरम्यान, पुण्यात आणखी एक घटना उघडकीस आली आहे. एका कॅडबरीत अळी आढळली असून या बाबतचा व्हिडिओ पुण्यातील महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस मीडिया विभागाचे अध्यक्ष अक्षय जैन यांनी एक्सवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दरम्यान, या बाबत त्यांनी कंपनीकडे तक्रार केली असता, भविष्यात असे काही आढळल्यास, आम्हाला ते चॉकलेट व त्यामध्ये सापडलेले पदार्थ पाठवण्यास विसरू नका. या बाबत आम्ही योग्य तपास करून तुमच्या समस्येचे निराकरण करू असं कंपनीनं सांगितले आहे.
कॅडबरी हा सर्वांच्या आवडीचे चॉकलेट आहे. लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्ति पर्यंत सर्व जण आवडीने हे चॉकलेट खात असतात. मात्र, डेअरी मिल्कच्या या चॉकलेटमध्ये यापूर्वीही अनेकदा अळी सापडल्याचे प्रकार घडले आहेत. पुण्यामध्ये देखील आता पुन्हा कॅटबरीत अळी सापडल्याने अनेकांनी समाज माध्यमांवर नाराजी व्यक्त केली आहे.
अक्षय जैन यांनी 'कॅडबरी टेंप्टेशन्स रम आणि मनुका प्रीमियम चॉकलेट बार' ही कॅडबरी विकत घेतली होती. त्यांनी ती खाण्यासाठी तिचे पॅकेट फोडले. यावेळी त्यांनी कॅडबरीचा तुकडा तोडला असता त्यात त्यांना दोन अळ्या दिसल्या. अक्षय जैन यांनी त्याचे फोटो आणि व्हिडीओ कंपनीला पाठवत या बद्दल तक्रार केली.
दरम्यान, अक्षय जैन यांच्या तक्रारीवर कंपनीने देखील प्रतिक्रिया दिली आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या घटनेबद्दल खेद व्यक्त केला आहे. भविष्यात आमच्या उत्पादनांमध्ये असे काही आढळल्यास आम्हाला जरूर कळवा. तसेच ते चॉकलेट आम्हाला परत पाठवा. त्याबाबत आम्ही योग्य तपास करू व तुम्हाला उत्तर देऊ. कंपनीच्या या उत्तरावर अक्षय जैन यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच कॅडबरीची गुणवत्तेबाबत ही ग्राहकांसाठी धक्कादायक घटना आहे असे देखील त्यांनी म्हटलं आहे.
अक्षय जैन यांची सोशल मिडियावर केलेली ही पोस्ट व्हायरल झाली आहे. कॅडबरी चॉकलेटमध्ये अळी आढळल्यामुळे ग्राहकांना देखील धक्का बसला आहे. अक्षय जैन यांच्या एक्सपोस्टवर अभिनंदन रिसबूड या व्यक्तीने देखील चॉकलेटचा फोटो शेअर करत अळी सापडल्याचे सांगितले आहे.