कोकणात येणाऱ्याअणुऊर्जा प्रकल्पाला उद्धव ठाकरेंनी विरोध केल्यानंतर संबंधित अणुऊर्जा प्रकल्प बासनात गुंडाळण्यात आला. कोकणात अणुऊर्जा प्रकल्प आला आणि तिथे भूकंप होऊन सुनामी आली तर अणुऊर्जा प्रकल्पात पाणी शिरून हाहाकार माजेल, असं कारण दिलं गेलं. मात्र कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना कल्पना नाही का, मुंबईत १९६० साली बाबा ऑटोमिक सेंटर उभे करण्यात आले आहे. त्यामध्ये न्यूक्लिअर रिऍक्टर आहेत, आपल्या शहराच्या मध्यभागी अणुऊर्जा प्रकल्प आहे तर कोकणातला अणुऊर्जा प्रकल्प रद्द का करायला लावला, असा सवाल राज ठाकरेंनी वरळीतील सभेतून केला.
राज ठाकरे म्हणाले की, हे असे विरोध सहज होत नसतात. यामागे खूप मोठे राजकारण असतं. नुसते साधे राजकारण नसते तर त्याच्यामागे सगळे आर्थिक राजकारण असतं.
या अणुऊर्जा प्रकल्पाचा विरोध करायला कोणत्या उद्योगपतीने सांगितले होते. कारण विरोधाला कोणता तरी उद्योगपती कारणीभूत असतोच. नाणारही ऑइल रिफायनरी येणार होती. या ऑइल रिफायनरीला उद्धव ठाकरेंनी विरोध कशासाठी केला असेल, विचार करा. त्यांच्या परिचयाची अशी कोण लोक आहेत ज्यांची ऑइल रिफायनरी आहे, ज्यांच्या लग्नाला ते जातात. अजून एक ऑइल रिफायनरी आली तर आपला मित्र तोट्यात जाईल आणि त्या मित्राचे नुकसान होऊ नये म्हणून कोकणात येऊ घातलेल्या ऑइल रिफायनरी प्रकल्पाला विरोध करण्यात आला.
राज ठाकरे यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पावरूनही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. धारावीच्या विकासाला उद्धव ठाकरे विरोध करत असून यामागे देखील आर्थिक राजकारणच असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला आहे.
मनसेचे उमेदवार संदीप देशपांडे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांनी वरळीतील जांभोरी मैदानावर सभा घेतली. वरळीत संदीप देशपांडे यांची लढत ठाकरे गटाचे विद्यमान आमदार आदित्य ठाकरे आणि शिंदे गटाचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्याशी लढत होणार आहे. त्यामुळे या हायप्रोफाईल लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
राज ठाकरे म्हणाले,आता काही लोकांची नाटकं बघायला मिळत आहेत. मला का तपासलं?बॅग तपासली. निवडणूक आयोगाच्या लोकांना कळायला हव होतं की, ज्यांच्या हातातून पैसे सुटत नाहीत ते बॅगेत पैसे ठेवणार का?
प्रसार माध्यमात माझ्या मुलाखती सुरु आहेत. सगळ्यांचा प्रश्न की तुम्ही आदित्य ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता. पण त्यांनीअमित ठाकरेंच्या विरोधातउमेदवार दिला. आता हा प्रत्येकाच्या वृत्तीचा भाग आहे.