Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंनी वरळीचा गड राखला! मिलिंद देवरा अन् मनसेचे संदीप देशपांडे पराभूत
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंनी वरळीचा गड राखला! मिलिंद देवरा अन् मनसेचे संदीप देशपांडे पराभूत

Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंनी वरळीचा गड राखला! मिलिंद देवरा अन् मनसेचे संदीप देशपांडे पराभूत

Nov 23, 2024 04:24 PM IST

Worli Assembly Constituency :महायुतीच्या वादळात आदित्य ठाकरेंनी कसाबसा आपला गड शाबूत ठेवला आहे.वरळी विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांचे पुत्र व शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

आदित्य ठाकरेंनी वरळीचा गड राखला!
आदित्य ठाकरेंनी वरळीचा गड राखला!

Aaditya Thackeray Won Worli Assembly Constituency : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. राज्यात महायुतीची जबरदस्त लाट आली असून महाविकास आघाडी कस्पाटासमान उडून गेली आहे. महायुतीच्या वादळात आदित्य ठाकरेंनी कसाबसा आपला गड शाबूत ठेवला आहे. वरळी विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांचे पुत्र व शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. मुंबईसह संपूर्ण राज्याचे लक्ष या हाय व्होल्टेज मतदारसंघाकडे लागले होते. मात्र आदित्य ठाकरेंनी ८ हजार ४०८ मतांनी विजय मिळवला आहे.

या मततदारसंघात ठाकरे कुटुंबाची आणि महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या मतदारसंघात आदित्य ठाकरेंना नमवण्यासाठी एकनाथ शिंदेंनी काँग्रेसमधून आलेल्या मिलिंद देवरा यांना मैदानात उतरवले होते. तर राज ठाकरेंनी संदीप देशपांडे यांना आदित्य ठाकरेविरोधात तिकीट दिले होते. अखेर आज मतमोजणीत देवरा व देशपांडे यांचा दारुण पराभव झाला आहे.

विधानसभा निवडणुकीचा निकाल दुपारनंतर स्पष्ट झाला असून राज्यात महायुतीचं सरकार कायम राहणार आहे. काँग्रेसचे अनेक मोहरे या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरेंनी कसाबसा आपला मतदारसंघ राखला आहे.

वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांनी आठ हजारांच्या मताधिक्यांनी विजय मिळवला आहे. आदित्य ठाकरे यांना पराभूत करण्यासाठी शिंदे गटाने जोरदार मोर्चेबांधणी केली होती. त्यासाठी काँग्रेसमधून आयात केलेल्या मिलिंद देवरा यांना वरळीतून मैदानात उतरवण्यात आले. गेल्या निव़डणुकीत मनसेकडून आदित्य विरोधात उमेदवार दिला नव्हता, मात्र यावेळी राज ठाकरेंनी संदीप देशपांडे यांना संधी देण्यात आली होती. त्यामुळे वरळीत तिहेरी लढत रंगली होती. मात्र आदित्य ठाकरेंनी शिंदे व काका राज ठाकरेंच्या माणसांना धूळ चारत विजय साकारला आहे.

ठाकरे घराण्यातला पहिला पराभव

वरळीनंतर मुंबईतील हायहोल्टेज लढत असलेल्या माहिम मतदारसंघातून धक्कादायक निकाल समोर आला आहे. माहिम मतदारसंघाच्या निकालाकडे अवघ्या मुंबईचं लक्ष लागलं होतं. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांचा दारुण पराभव झाला आहे. येथे ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत विजयी झाले आहेत. ठाकरे घराण्यातील हा पहिला पराभव आहे. येथून शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर पराभूत झाले आहेत.

पहिल्याच निवडणुकीत अमित ठाकरे पराभूत झाले आहेत. विशेष म्हणजे, अमित ठाकरे यांच्यासाठी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी अर्ज मागे घ्यावा अशी विनंती केली होती. पण सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम होते. त्यामुळे ही निवडणूक सदा सरवणकर विरुद्ध अमित ठाकरे होईल असा अंदाज होता. पण महेश सावंत यांनी माहिममधून बाजी मारली आहे.

Whats_app_banner