मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Cancer Prabodhan Yatra: विविध शहरांमध्ये जनजागृती करत निघाली कॅन्सर प्रबोधन यात्रा

Cancer Prabodhan Yatra: विविध शहरांमध्ये जनजागृती करत निघाली कॅन्सर प्रबोधन यात्रा

Hiral Shriram Gawande HT Marathi
Feb 05, 2024 10:02 PM IST

World Cancer Day: कॅन्सरबाबत समाजात जनजागृती निर्माण करण्यासाठी अहमदनगर येथून कॅन्सर प्रबोधन यात्रा निघाली असून, १० फेब्रुवारी रोजी जळगाव येथे समारोप होणार आहे.

कॅन्सर प्रबोधन यात्रा
कॅन्सर प्रबोधन यात्रा

Cancer Prabodhan Yatra: अहमदनगर येथील आरंभ पॅलिएटिव्ह कॅन्सर केअर सेंटर, प्रयास अमरावती व टीम तरुणाई यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर ते जळगाव कॅन्सर प्रबोधन यात्रा निघाली. जागतिक कर्करोग दिनानिमित्त दर वर्षी होणाऱ्या या यात्रेचा शुभारंभ ४ फेब्रुवारी रोजी अहमदनगर येथून झाला असून, १० फेब्रुवारी रोजी जळगाव येथे समारोप होणार आहे.

या यात्रेचा शुभारंभ अहमदनगर येथील रेल्वे स्टेशन येऊन करण्यात आला. यावेळी कॅन्सर होण्याची लक्षणे, कारणे व उपचार या विषयावर आरंभचे अध्यक्ष सुधीर लांडगे यांनी माहिती दिली. शासकीय तंत्रनिकेतन मधील विद्यार्थिनींना अहमदनगर मधील पहिल्या ब्रेस्ट सर्जन डॉ. तेजश्री जुनागडे यांनी स्व तपासणी बद्दल सांगितले. यावेळी शहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली. ही यात्रा ५ फेब्रुवारीला संगमेनर, ६ फेब्रुवारी नाशिक, ७ फेब्रुवारी मालेगाव, ८ फेब्रुवारी नंदुरबार, ९ फेब्रुवारी धुळे मार्गे १० फेब्रुवारीला जळगाव मधील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय येथे समारोप होणार आहे.

या यात्रेदरम्यान विविध शहरातील विविध शाळा, महाविद्यालय तसेच स्थानिक संस्था, कार्यालय येथे प्रबोधन कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. शिवाय मुक्कामाच्या ठिकाणी त्या शहरातील नागरिकांसाठी जनजागृती कार्यक्रम होतील. या कॅन्सर जनजागृती मोहिमेत राज्यातील तरुण सहभागी झाले आहेत.

पथनाट्यातून जनजागृती

कॅन्सर जागृतीसाठी शहरात विविध ठिकाणी पथनाट्य सादर करण्यात आले. यात्रेदरम्यात रेल्वे स्टेशन, माळीवाडा वेस, माळीवाडा बस स्टँड येथे पथनाट्य सादर करण्यात आले. सादरीकरण करण्यात आले. पथनाट्याच्या माध्यमातून वैभव पाटील, साहिल तुपे, उमेश सपाटे, पवन चोरगे, डॉ. ज्ञानप्रसाद जाधव, पुरुषोत्तम बागल, यांनी व्यसनमुक्तीचा संदेश प्रभावीपणे दिला. या यात्रेदरम्यान विविध शहरांमध्ये हे पथनाट्य सादर करण्यात येणार आहे.

WhatsApp channel