Womens Day: पर्यावरण संरक्षणासाठी लढणाऱ्या डॉ. विनीता आपटे
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Womens Day: पर्यावरण संरक्षणासाठी लढणाऱ्या डॉ. विनीता आपटे

Womens Day: पर्यावरण संरक्षणासाठी लढणाऱ्या डॉ. विनीता आपटे

Updated Mar 08, 2023 07:25 PM IST

जगात पर्यावरण धोक्यात आलं असताना आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरण क्षेत्रात अनेक महिला सक्रीय आहेत. पृथ्वीवरचं पर्यावरण वाचवण्यामध्ये अनेक मराठी महिला योगदान देत आहेत. पाणी, विजेची बचत, स्वच्छता यासारख्या गोष्टी महिला प्रभावी पद्धतीने करु शकतात.या प्रमुख नाव म्हणजे तेर पॉलिसी सेंटरच्या संस्थापिका डॉ. विनीता आपटे

Dr Vineeta Apte, Founder and Director of TERRE Policy Centre
Dr Vineeta Apte, Founder and Director of TERRE Policy Centre

कोणत्याही देशाची प्रगती व्हायची असेल तर स्त्री आणि पुरुष या समाजातील दोन्ही पंखांचा सन्मान होणं गरजेचं असतं. महिला आघाडीवर नाहीत असं आज एकही क्षेत्र नाही. अशा महिलानी इतरही महिलाना सक्षम बनवणं ही खरी गरज आहे. मी पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक महिला बघत असते. सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या यशस्वी महिलाना अनेकदा पुरुषी अहंकाराचा सामना करावा लागतो. त्या शिवाय महिला सहकारीपण अनेकदा दुस्वास करतात. त्यामुळे दोन्ही आघाड्यांवर महिलांचे शत्रु निर्माण होतात. सकारात्मक वृत्ती, खंबीरपणे निर्णय घेण्याची क्षमता या गोष्टी महिलांनी आत्मसात केल्या तर कोणतेही काम कठीण नाही, असं मत डॉ. आपटे व्यक्त करतात.

पर्यावरणप्रेमी प्रवास

बँकेतील नोकरीचा अनुभव, आवड म्हणून अभिनय, सूत्रसंचालन अशी व्यवधाने असली तरी पर्यावरणाच्या प्रश्नांबाबत असलेल्या जिव्हाळ्यातून डॉ. विनिता आपटे यांनी तेर (TERRE - Technology, Education, Research Rehabilitation for the Environment) या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. पॅरिसमध्ये युनायटेड नेशन्स एनव्हॉयर्नमेंटमध्ये काम करण्याची संधी मिळाल्यानंतरही ते काम पूर्ण झाल्यानंतर भारतात येऊन पर्यावरण क्षेत्रात त्यांनी आपले काम सुरू ठेवले. गेल्या ७ वर्षांमध्ये अडीच लाखापेक्षा जास्त झाडे लावून त्यांचे जतन करण्याचे काम 'तेर' संस्थेने केले आहे. सध्या डोलवि, काराव, जांभळी, कोडीत, दांडेली, जुई या गावांमध्ये जवळपास ५ हजारपेक्षा जास्त शेतकरी कुटुंबांना उपजीविकेचे साधन मिळावे व तिथल्या जमिनीचा कस वाढावा म्हणून ५० हजार फळझाडे संस्थेतर्फे देण्यात आली आहे. कोडीतमध्ये आदिवासी संग्रहालय सुरू करून तिथल्या युवकांना व महिलांसाठी रोजगार निर्मितीच्या अनेक वाटा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

निसर्ग संरक्षण क्षेत्रात कामगिरी

संवर्धनासाठी केवळ झाडे लावणे पुरेसे नाही तर त्यांचे जतन तेवढेच आवश्यक आहे, या जाणिवेतून त्यांनी कामाला सुरुवात केली. पुण्यातील वारजे परिसरातील टेकडीवर झाडे लावणे आणि जगवणे या कामात त्या सातत्याने योगदान देत आहेत. पर्यावरणाबाबत आस्था असलेल्यांची संख्या लक्षणीय आहे, मात्र त्याला प्रत्यक्ष कृतीची जोड देणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. भारतात होणार असलेल्या G20 अंतर्गत civil20 मधल्या शाश्वत विकास व हवामान बदल या कृती समितीमध्ये त्या सहभागी असून त्यासाठी पुढील काही महिने विविध कार्यक्रमांच्या आयोजनाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. पर्यावरण जागृतीसाठी तेर ऑलिम्पियाड, एन्व्हायरॉथॉन यासारख्या स्पर्धांचे आयोजन सातत्याने केले जाते. पर्यावरण पत्रकारिता आणि असे अनेक पुरस्कार दिले जातात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर