महिला काँग्रेसने फोडली भ्रष्टाचार व महागाई विरोधात दहीहंडी
Womens Congress dahi handi : महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटना,जातीयवाद,महागाई यांचा विरोध करण्यासाठी मुंबईतील महिला काँग्रेसने प्रतिकात्मक दहीहंडी फोडली.
देशातील वाढती दडपशाही, महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटना, जातीयवाद, महागाई यांचा विरोध करण्यासाठी मुंबईतील महिला काँग्रेसने एक अनोखा उपक्रम राबवला. गोकुळाष्टमीचं औचित्य साधून महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भ्रष्टाचार, जातीयवाद आणि महागाई यांच्या विरोधातील प्रतिकात्मक दहीहंडी फोडून निषेध केला. या सोहळ्याच्या केंद्रस्थानी मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष आमदार वर्षा गायकवाड होत्या. या दहीहंडी सोहळ्यासाठी शहर आणि उपनगरांतून मोठ्या संख्येने काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
ट्रेंडिंग न्यूज
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनंतर राज्यासह मुंबईतील काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नव्यानेच नियुक्ती झालेल्या आमदार वर्षा गायकवाड यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात विविध उपक्रम राबवून मुंबई काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण केलं आहे. आता महिला कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई प्रदेश महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी बुधवारी मुंबई काँग्रेसच्या पटांगणात महिला दहीहंडीचे आयोजन केले होते.
या दहीहंडीच्या सोहळ्यासाठी मुंबई शहर आणि उपनगरांमधून मोठ्या संख्येने काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. दहीहंडी फोडणाऱ्यांमध्ये मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष आ. वर्षा गायकवाड अग्रस्थानी होत्या. त्यांनी महिला कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवत भ्रष्ट सरकारविरोधात घोषणा देत ही दहीहंडी फोडली. २०२४ मध्ये भाजप सरकारच्या पापाचा घडाही या हंडीसारखाच फुटेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
भ्रष्टाचाराविरोधात रणशिंग फुंकत सत्तेत आलेल्या मोदी सरकारच्या काळातच भ्रष्टाचार फोफावला आहे. त्याशिवाय महागाईने देखील उच्चांक गाठला आहे. तसंच देशभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या संख्येत वाढ झाली आहे. या सर्व कारभाराचा निषेध करण्यासाठी आम्ही ही प्रतिकात्मक दहीहंडी फोडली, असं आ. वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं.
विभाग