राज्य सरकारकडून राज्यभरात लाडकी बहीण योजनेच्या प्रचारार्थ मेळावे घेतले जात आहेत. आज यवतमाळ येथे आयोजित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती आणि महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमात गोंधळाची स्थिती निर्माण झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू होताच काही महिलांनी गोंधळ घातल्याने सुरक्षा यंत्रणांची चांगलीच तारांबळ उडाली.
यवतमाळमध्ये आयोजित लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरु असताना काही महिलांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. महिला पोलीस कर्मचारी आणि कार्यक्रमाला आलेल्या काही महिलांमध्ये बाचाबाची झाल्याचंही समोर आलं आहे. आपल्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला नाही, काही तांत्रिक अडचणीमुळे यात अडचणी येत आहेत. या तक्रारी महिलांना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवायच्या होत्या. पण त्यांना महिला पोलिसांनी रोखल्यानं महिलांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. हा गोंधळ पाहून मुख्यमंत्र्यांनी आपले भाषण थांबवलं.
मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री मंडपात उभारलेल्या रॅम्पवरून महिलांना अभिवादन करत जात असताना प्रशासनाने परवानगी दिलेल्या मोजक्या महिलांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना राखी बांधली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महिलांशी संवाद साधत लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झाले का?अशी विचारणा केली. त्यानंतर मुख्यमंत्री भाषणासाठी उभे राहताच त्यांच्या उजव्या बाजूच्या मंडपातील काही महिलांनी जोरजोराने ओरडत गोंधळ घातला. मुख्यमंत्र्यांनी भाषण थांबवत त्यांना आपल्याकडे येऊ द्या. त्यांची काय तक्रार आहे,हे जाणून घेऊ द्या,अशी सूचना सुरक्षा यंत्रणेस केली. मात्र त्यानंतरही महिलांची घोषणाबाजी सुरूच होती. त्यानंतर पालकमंत्री संजय राठोड व पोलीस अधिकाऱ्यांनी महिलांजवळ पोहचून त्यांची तक्रार जाणून घेतली. संजय राठोड यांनी एक चिठ्ठी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवली. तेव्हा त्या महिला दिग्रस तालुक्यातील आनंदवाडी पारधी बेड्यावरील असल्याचे आणि त्यांची पोलिसांबाबत काही तक्रार असल्याचे समोर आले. या महिलांना त्रास देणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी भाषणातून दिली. त्यानंतर महिला शांत झाल्या.
मुख्यमंत्री भाषण करताना गोंधळ घालणाऱ्या या महिला यवतमाळमधल्या दिग्रस पारधी बेड्यावरील रहिवासी आहेत. या महिला यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या मतदार संघातील आहेत. महिलांनी गोंधळ घालायला सुरुवात केल्यावर पालकमंत्री संजय राठोड आणि आमदार भावना गवळी या महिलांकडे पोहोचले आणि त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. पोलिसांनी अन्याच केल्याचा आरोप त्यांनी केलाय.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात महिलांना आवाहन केले की, ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत, त्यांनी आपले हात उंचावावेत. त्यावेळी संपूर्ण सभागृहातील महिलांना हात उंचावून समर्थन दिले. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले की, ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील त्यांच्या खात्यात लवकरच रक्कम जमा होईल आणि सप्टेंबर महिन्यात जुलै,ऑगस्ट,सप्टेंबर या तीन महिन्यांचे पैसे जमा होतील. ज्यांच्या खात्यात पैसे आले नाहीत त्यांना चिंता करण्याची गरज नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.