Devendra Fadnavis Mantralaya Office : राज्याचा गाडा हाकला जाणाऱ्या मंत्रालयातून मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची तोडफोड करण्याचा प्रयत्न झाल्याचं समोर आलं आहे. एका महिलेनं हा तोडफोडीचा प्रयत्न केला. दरवाजावरील नावाची पाटी तोडून तिनं घोषणाबाजीही केली. त्यामुळं खळबळ उडाली आहे.
आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेनं पास न घेताच मंत्रालयात प्रवेश केला होता. प्रवेश केल्यानंतर ती थेट फडणवीसांच्या कार्यालयापर्यंत पोहोचली आणि तिनं तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळं मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्थेचा ऐरणीवर आला आहे.
तोडफोड करणारी व्यक्ती ही एक महिला असल्याचं एका व्हिडिओतून समोर आलं आहे. मात्र, ती नेमकी कोण होती आणि ते हे कृत्य का केलं, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मरीन ड्राइव्ह पोलिसांनी या महिलेचा शोध सुरू केला आहे.
मंत्रालयातील या घटनेवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर अशा प्रकारे तोडफोड होत असेल तर ही गंभीर गोष्ट आहे. गृहमंत्र्यांच्या सुरक्षेतच इतकी मोठी हेळसांड होत असेल तर सरकार म्हणून आपण काय करतोय? मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर सर्व प्रकारची आधुनिक सुरक्षा आहे. ती भेदून कुणी मंत्रालयात प्रवेश करून तोडफोड करत असेल तर ही चिंतेची बाब आहे. गृहमंत्रीच सुरक्षित नसतील तर ते राज्यातील महिलांना काय सुरक्षा देणार? असा प्रश्नही सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.
विजय वडेट्टीवार यांनी मंत्रालयात तोडफोड करणाऱ्या महिलेचा व्हिडिओ शेअर करत राज्य सरकारवर तोफ डागली आहे. ‘एकीकडं सरकारचे लाडक्या बहिणीचे इव्हेंट सुरू आहेत तर दुसरीकडं एक महिला मंत्रालयात येऊन संतापानं देवेंद्र फडणवीसांच्या नावाची पाटी फोडतेय. राज्यातील ही दोन चित्रं खूप काही सांगून जातात’, अशी मार्मिक प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार व प्रवीण दरेकर यांनीही या प्रकाराबाबत चिंता व्यक्त केली आहे. तपासातून सत्य पुढं येईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.