आईची हत्या करून मृतदेहाचे केले तुकडे, क्राईम पेट्रोल पाहून सुचली कल्पना, लालबाग येथील हत्येने खळबळ
Lalbaug Crime: लालबाग हत्याकांड प्रकरणात पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली आहे.
Lalbaug Murder: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील लालबागमधील हत्याकांडने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. एका मुलीने आईची हत्या केली आणि तिच्या मृतदेहाचे तुकडे करून घरात लपवून ठेवले. आरोपी मुलीला टीव्ही क्राईम मालिका पाहायची आवड होती. याच मालिकेतून आईची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे तुकडे करण्याची आरोपीला कल्पना सुचली, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. मात्र, महिलेच्या मृत्युचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस शवविच्छेदनाच्या अहवालाची वाट पाहत आहेत.
ट्रेंडिंग न्यूज
मिळालेल्या माहितीनुसार, वीणा जैन (वय, ५५) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या आपल्या मुलीसोबत काळीचौकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इब्राहिम कासम इमारतीत राहायच्या. वीणा जैन यांची २७ डिसेंबर २०२३ रोजी हत्या करण्यात आली. याच दिवशी आरोपी रिंपल जैन (वय, २३) हिने फिनाईल आणि रूम फ्रेशनर खरेदी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांना आरोपीच्या घरातून मार्बल कटिंग मशीनही सापडली, याच मशीनच्या आधारे रिंपलने आईच्या मृतदेहाचे तुकडे केले, असा संशय आहे.
रिंपलने बारावीतच शिक्षण सोडले. तिच्या वडिलांचे २० वर्षांपूर्वी निधन झाले होते. रिंपलने तिच्या आईच्या हत्येचे आरोप फेटाळून लावले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांचे जबाब नोंदवून घेतले आहे. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.