Nagpur Stampede: नागपूर येथील सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर, चार जण जखमी झाल्याची माहिती समोर आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील रेशिमबाग परिसरात भारतीय जनता पक्षातर्फे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या क्रार्यक्रमात बांधकाम मजुरांना भांडी वाटप करण्यात आली. यामुळे घटनास्थळी नागरिकांनी प्रचंड गर्दी केल्याची समजत आहे.
सक्करदरा पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रेशीमबाग येथे भाजपच्या नागपूर शाखेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. या कार्यक्रमात बांधकाम मजुरांना भांडी वाटप करण्यात येत असून कार्यक्रमस्थळी मोठ्या संख्येने लोक जमले होते. त्यानंतर चेंगराचेंगरीत मनू तुळशीराम राजपूत (वय, ५०) जखमी झाल्या. त्यांना त्वरीत जवळील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेत अन्य चार महिला जखमी झाल्या. मात्र, त्यांची दुखापत किरकोळ असल्याचे समजत आहे. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे. मात्र, या घटनेने राजपूत यांच्या कुटुंबावर दु:खाचे डोंगर कोसळले आहे.
संबंधित बातम्या