Mumbai- Pune Expressway News: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गालगत झुडपात एका महिलेचा मृतदेह गोणीत आढळून आल्याने खळबळ माजली. शिरगाव फाटा परिसरात सोमवारी (२५ नोव्हेंबर २०२४) साफसफाई करणाऱ्या कामगारांना हा मृतदेह आढळून आला. त्यांनी तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली, त्यानंतर तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आला. दोन दिवसांपूर्वी संबंधित महिलेची हत्या करण्यात आल्याची पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गालगत झुडपात सफाई कामगारांना रक्ताने माखलेली गोणी आढळून आली. सफाई कामगारांना वेगळाच संशय आल्याने त्यांनी ताबडतोब याची माहिती तळेगाव दाभाडे पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृत महिलेचे वय ३० च्या आसपास असण्याची शक्यता आहे. या घटनेच्या प्राथमिक तपासात मृत पीडितेचा मृतदेह कुजण्यास सुरुवात झाल्याने किमान दोन दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, तपास अधिकाऱ्यांनी पीटीआयला सांगितले की, मृत महिलेची ओळख पटविण्यासाठी घटनास्थळी कोणतेही पुरावे सापडले नाहीत. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास सुरू आहे.