Thane Crime news : संपूर्ण राज्यात दिवाळी उत्साहात साजरी होत असतांना ठाण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील हिरानंदानी इस्टेटमधील पेनिकल या इमारतीच्या २२ व्या मजल्यावरुन उडी मारून एका महिलेने तिचे जीवन संपवलं आहे. ही महिला या इमारतीत एका रुग्णाला मसाज देण्यासाठी आली होती. घरची परिस्थिती बेताची असल्याने आणि पती व मुलगा दुर्धर आजाराने ग्रस्त असल्याने या महिलेने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
ही बातमी पसरताच संकुलातील इतर मोलकरणींनी एकत्र येऊन निषेध नोंदवला कारण सुरुवातीला ती इमारतीवरून पडल्याचा अंदाज होता. परंतु, नंतर सीसीटीव्ही फुटेजमध्ये तिच्या मृत्यूचे कारण आत्महत्या असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी कासारवडवली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
मृत महिला ही वाघबीळ परिसरातील रहिवासी असून ती मुळची जळगाव जिल्ह्यातील रहिवासी आहे. ती वयाच्या १९ व्या वर्षापासून ठाण्यात स्थायिक झाली होती. माजी ड्रायव्हर असलेल्या तिच्या पतीने नुकतेच आरोग्याच्या कारणास्तव काम सोडले व पाच जणांच्या कुटुंबाचा गाडा ओढण्यासाठी ही महिला एकटीच झटत होती. मृत महिलेला तीन मुले आहेत. मुलीचे लग्न झाले असून इतर दोन मुले ही शिक्षण घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ही महिला नियमित कामानिमित्त घराबाहेर पडली होती. वूड स्ट्रीटवरील पेलिकन इमारतीतील मालकांच्या घरी काम आटोपल्यानंतर ती २२ व्या मजल्यावरील रेफूजी एरियात गेली. या ठिकाणी तिने उडी मारून आत्महत्या केली. कासारवडवली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. आत्महत्या करण्यापूर्वी या महिलेने पायऱ्यांवर बसून गुटखा खाल्ला. यानंतर ती २२ मजल्यावरील रेफ्युज एरियात गेली आणि तेथून खाली उडी मारली.
या महिलेचा पती किडनीच्या विकाराने त्रस्त असून एका मुलं डोळ्यांचा विकार आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ती नैराश्यात होती. याच नैराश्यातून तिने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
या महिलेच्या सहकारी शैलजा पाटील म्हणाल्या, 'आम्ही बराच काळ एकत्र काम केले आहे आणि नेहमीच एकमेकांना नवे काम देण्यास मदत केली आहे. मृत महिला ही चांगल्या स्वभावाची होती. तिच्या मृत्यूची बातमी मिळाली, तेव्हा मला धक्का बसला. मला आश्चर्य वाटले की तीने हा टोकाचा निर्णय का घेतला.
कासारवडवली पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही तातडीने इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आम्हाला ही महिला एकटीच इमारतीच्या रेफूजी एरियात असल्याचे दिसून आले.
या घटनेनंतर हिरानंदानी इस्टेटमध्ये एकच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात महिलेचे शवविच्छेदन करण्यात आले व त्यानंतर तिचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे.