मला चितेवर ठेवण्याआधी टाइट हग द्या; पतीच्या त्रासाला कंटाळून संभाजीनगरात महिला डाॅक्टरची आत्महत्या-woman doctor ends life after husband torture write heart wrenching suicide letter will bring tears to your eyes ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मला चितेवर ठेवण्याआधी टाइट हग द्या; पतीच्या त्रासाला कंटाळून संभाजीनगरात महिला डाॅक्टरची आत्महत्या

मला चितेवर ठेवण्याआधी टाइट हग द्या; पतीच्या त्रासाला कंटाळून संभाजीनगरात महिला डाॅक्टरची आत्महत्या

Aug 28, 2024 10:06 AM IST

Chhatrapati Sambhajinagar News: आत्महत्या करण्यापूर्वी प्रतीक्षाने सात पानांची सुसाईड नोट लिहिली आहे. त्याची सुरुवात तिनं'डियर अहो',असं म्हणत पतीला उद्देशून मजकूल लिहिला आहे. प्रतीक्षाचं हे पत्र वाचून अनेकांचे डोळे पाणावत आहेत.

पतीच्या छळाला कंटाळून महिला डॉक्टरने संपवलं आयुष्य
पतीच्या छळाला कंटाळून महिला डॉक्टरने संपवलं आयुष्य

Woman Doctor Ends Life After Husband Torture : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका महिला डॉक्टरने पतीच्या छळाला कंटाळून आत्महत्या करत जीवन संपवलं आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून नागरिक मृत महिलेसाठी न्यायाची मागणी करत आहेत. प्रतीक्षा गवारे असे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचे नाव असून तिच्याजवळ ७ पानांचे सुसाइड लेटर मिळाले आहे. त्यामध्ये तिने पतीकडून होणाऱ्या मानसिक त्रासाचा उल्लेख केला आहे. त्यात म्हटले आहे की, पती तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता व हुड्यांची मागणी करत होता. यामुळे तिने टोकाचे पाऊल उचलले.

डॉ. गवारे हिच्या आत्महत्येनंतर तिच्या वडिलांनी सिडको पोलीस ठाण्यात प्रीतम शंकर गवारे याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. प्रीतम फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

प्रतीक्षाला मोठं गायनाकॉलॉजिस्ट व्हायचं होतं. तशी वाटचालही तिने सुरू केली होती. मात्र पतीच्या संशयी स्वभावामुळे व त्यातून होणाऱ्या छळामुळे तिला जगाचा निरोप घ्यावा लागला.

आत्महत्या करण्यापूर्वी प्रतीक्षाने सात पानांची सुसाईड नोट लिहिली आहे. त्याची सुरुवात तिनं'डियर अहो',असं म्हणत पतीला उद्देशून मजकूल लिहिला आहे. प्रतीक्षाचं हे पत्र वाचून अनेकांचे डोळे पाणावत आहेत.

डॉ. प्रतीक्षा हिने नवऱ्याला लिहिलेले पत्र पुढीलप्रमाणे…

डिअर अहो,

खूप प्रेम केलं हो तुमच्यावर,जिवापाड प्रेम केलं. स्वतःला विसरुन गेले तुमच्यासाठी. माझ्यासारख्या हसत्या,खेळत्या मुलीला त्रास देऊन मंद करुन टाकलं तुम्ही. एका स्वावंलबी, AmbitiousमुलीलाDependentबनवलं तुम्ही. खूप स्वप्नं घेऊन लग्न केलं होतं तुमच्याशी की हे मला खूप जीव लावतील. काळजी करतील,करिअरमध्ये सपोर्ट करतील. आपली छोटीशी फॅमिली असेल. तुम्हाला मुलगा हवा होता,त्यासाठीच तयारी करत होते मी. गोंडस बाळ असतं आपलं तर ही वेळ तुम्ही माझ्यावर आणली नसती. तुम्ही सांगितलं म्हणून मी सगळं सोडलं. मित्र-मैत्रिणी,नातेवाईक,आई वडिलांशी बोलल्यावर तुम्हाला राग यायचा म्हणून त्यांच्याशीही जास्त बोलत नव्हते. पण तरीही तुमचं पोट भरलं नाही. मोबाइल बदल म्हणाले,बदलला. नंबर बदल म्हणून वाद घातले,त्यासाठीही तयार झाले. तरीही तुमचा संशय संपला नाही. सतत माझ्या चारित्र्यावर संशय घेत आलात. पण देवाशप्पथ सांगते मी तुमच्याशी प्रामाणिक होते आणि राहिले. माझ्या चारित्र्यात काहीच खोट नाही.

माझ्या कर्तव्याला दिखावा करते असं म्हटलंत त्याचं वाईट वाटलं.सासू-सासऱ्यांची काळजी घेतली,कधी उलटसुलट बोलली नाही. त्यांनी पण मला जीव लावला. पण माझ्या कर्तव्याला तुम्ही दिखावा करते,असे म्हटले. मला त्याचं फार वाईट वाटलं म्हणून काल देवाला जाताना मम्मी पप्पांना कॉल केला नाही. मला पटत नव्हतं पण मी कंट्रोल केलं. तुमच्यावर मी लग्नाअगोदर पैसा खर्च केला. तरी तुम्ही त्यातले पैसे आई-वडिलांना लग्नाच्या खर्चासाठी दिले म्हणून वाद घातले. तो पैसा मी माझ्या कष्टाने आणि आईवडिलांच्या साथीने कमावला. मला खूप मोठी गायनोकोलॉजिस्ट व्हायचं होतं. पण सगळं पाण्यात बुडवलं तुम्ही त्रास देऊन. शेवटी एवढंच म्हणेल,माझ्या आईवडिलांना मी नसले तरी कुणाल आहे. पण तुम्ही एकटे आहात. सासू सासऱ्यांना नीट सांभाळा. त्यांच्यावर चिडचिड करत जाऊ नका. आय लव्हू यू सो मच. बाय. यू आर अ फ्री बर्ड नाऊ.

तुम्ही गोड आहात दिसायला,गोड राहा आणि कधी थोडंसं जरी प्रेम केलं असेल माझ्यावर तर मला एक टाइट हग करुनच चितेवर ठेवा. बाकी आयुष्य मला विसरून आनंदाने जगा.

तुमचीच

प्रतीक्षा

अशी चिठ्ठी लिहून प्रतीक्षा गवारे यांनी आत्महत्या केली आणि आयुष्य संपवलं आहे. दरम्यान तिच्या आत्महत्येच्या घटनेपासून पती फरार आहे.

 

संबंधित बातम्या

विभाग