Sion Crime : कोलकात्यात महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. ही घटना ताजी असतांना मुंबईत महिला डॉक्टरसोबत गैरवर्तन केल्याची घटना उघडकीस आली आहे. दारूच्या नशेत दवाखान्यात आलेल्या एका मद्यधुंद तरुणाने व त्याच्या नातेवाईकांनी महिला डॉक्टर व तिच्या एका नर्सला मारहाण केली. ही घटना मुंबईतील सायन रुग्णालयात आज सकाळी घडली. ही घटना पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली, यावेळी रात्रीच्या ड्युटीवर महिला डॉक्टर होती.
आरोप असलेल्या रुग्णाच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या होत्या. यावर उपचार घेण्यासाठी तो व त्याचे काही नातेवाईक त्याला रुग्णालयात घेऊन आले होते. यावेळी महिला डॉक्टर त्याच्यावर उपचार करत असताना त्याने महिला डॉक्टर व अटेंडंटला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच महिला डॉक्टरला धमकावत त्याने मारहाण केली. तर त्याच्या सोबत असलेल्याणी देखील रुग्णालयात तोडफोड केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोकमान्य टिळक रुग्णालयात आज पहाटे काही नागरिक एकाला घेऊन आले होते. जखणी तरुण हा दारूच्या नशेत होता. त्याच्या जखमेला टाके घालावे लागणार होते. तर या पूर्वीच त्याच्या जखमेला टाके घालण्यात आले होते. यावेळी त्याच्या जखमेत अडकलेला कापूस डॉक्टर काढत असतांना रुग्णाने डॉक्टरांशी वाद घालण्यास सुरूवात केली. यावेळी नेमकं काय झालं आहे हे पाहण्यासाठी जखम मोकळी करावी लागते, असे डॉक्टरने सांगितले. मात्र, जखम पाहत असतांना रुग्णाला दुखल्याने त्याने महिला डॉक्टरला जोरदार ढकललं व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने दारू प्यायली असल्याचं पुढं आलं. यानंतर त्याच्या नतेवकांनी देखील मोठा राडा घातला. त्यानंतर पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार देण्यात आली आहे.
सायन मार्ड असोसिएशनचे सचिव डॉ.अक्षय मोरे यांनी या घटनेची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, रुग्ण रात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान दवाखान्यात आला होता. त्याच्यासोबत आठ नातेवाईकही होते. रुग्णाने दारूचे सेवन केले होते. हे लोक मारहाण करून बाहेरून उपचार घेण्यासाठी दवाखान्यात आले होते. जखमी तरुणाच्या चेहऱ्यावर जखमा होत्या. चेहऱ्याला दुखापत झाल्याने त्यांना पहाटे ३.३० वाजता ईएनटी विभागात रेफर करण्यात आले. तेथे ड्यूटीवर असलेल्या महिला डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले आणि तपासणीसाठी आधीचे लावलेले बँडेज काढण्यास सुरुवात केली. डॉक्टर मोरे यांनी सांगितले की, ही नेहमीची प्रक्रिया आहे, मात्र यादरम्यान रुग्णाने महिला डॉक्टरला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यानंतर त्याच्यासोबत असलेल्या नातेवाईकांनीही रुग्णाची काळजी घेण्याऐवजी डॉक्टरांशीच हाणामारी सुरू केली. एवढेच नाही तर रुग्णाने डॉक्टरांच्या चेहऱ्यावर रक्ताचे डाग असलेले बँडेज व कापसाचे बोळे फेकून मारले. हा सर्व प्रकार पाहून तेथे उपस्थित असलेल्या परिचारिकांनी मध्यस्थी करत सुरक्षारक्षकांना बोलावले. मात्र तोपर्यंत रुग्ण व नातेवाईक तेथून पळून गेले होते.
या प्रकरणी महिला डॉक्टरने सायन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायन रुग्णालयातील डॉक्टरांच्या संघटनेचे सदस्यही पोलीस ठाण्यात पोहोचले आणि त्यांनी सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करता येणार नाही, असे संघटनेच्या लोकांनी सांगितले. अशा परिस्थितीत त्वरित लक्ष देणे आवश्यक आहे. याशिवाय सर्व रुग्णालयांमध्ये सुरक्षा वाढवण्याची गरज आहे. डॉक्टर मोरे म्हणाले की, अशा घटना अनेकदा रुग्णालयात घडतात. त्यामुळे येथे सुरक्षा वाढवावी. कोलकाता येथील घटनेबद्दल त्यांनी दु:खही व्यक्त केले आणि पीडितेला न्याय देण्याची मागणी केली.