मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  LTT-प्रयागराज दुरंतोमध्ये महिलेची प्रसूती; टीसी, सहप्रवासी आले मदतीला!

LTT-प्रयागराज दुरंतोमध्ये महिलेची प्रसूती; टीसी, सहप्रवासी आले मदतीला!

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 03, 2024 10:57 PM IST

Ltt-Prayagraj Duronto Express : लोकमान्य टिळक टर्मिनस ते प्रयागराज दुरंतो एक्स्प्रेसच्या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनीB१२ कोचमधील एका महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यावर तत्काळ हालचाल केली. त्यांनी सहप्रवाशांच्या मदतीने महिलेची सुखरुप प्रसूती केली.

LTT-प्रयागराज दुरंतोमध्ये महिलेची प्रसूती
LTT-प्रयागराज दुरंतोमध्ये महिलेची प्रसूती

LTT-Prayagraj Duronto Express  : लोकमान्य टिळक टर्मिनस - प्रयागराज दुरंतो एक्स्प्रेसमध्ये एका महिलेची प्रसुती झाली आहे. तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी सहप्रवाशाच्या मदतीने महिला प्रवाशाला प्रसुतीस  मदत केली. टीसी आणि ट्रेन मधील सहप्रवासी मदतीला धावून आल्याने महिलेची सुखरुप प्रसूती झाली. मध्य रेल्वेने ट्वीट करत या प्रसंगामध्ये मदतीला आलेल्या प्रवासी व रेल्वे कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे. दरम्यान नवजात बाळ आणि आई दोघांचीही प्रकृती ठीक असल्याचे मध्य रेल्वेने म्हटले आहे.

सतर्कता आणि तत्परता याचे उदाहरण रेल्वेत पाहायला मिळाले. १२२९३ लोकमान्य टिळक टर्मिनस ते प्रयागराज दुरंतो एक्स्प्रेसच्या (Ltt-Prayagraj Duronto Express) तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी B१२ कोचमधील एका महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यावर तत्काळ हालचाल केली.  महिलेच्या प्रसूती वेदना पाहून धावत्या गाडीतील तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी त्वरीत प्रतिसाद देत बोगीतील अन्य महिला प्रवाशाच्या मदतीने गर्भवती महिलेला सुरक्षितपणे प्रसूतीसाठी मदत केली. 

ही घटना तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी तत्काळ नियंत्रण कक्षाला कळवली आणि बुरहानपूर येथे ट्रेनचा तात्काळ थांबा देण्याची व्यवस्था केली. त्यानंतर आई आणि नवजात बाळाला पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. बुरहानपूरच्या सिटी हॉस्पिटलमध्ये आई आणि नवजात बाळ दोघेही निरोगी आहेत. ते कुटुंब त्यांच्या मूळ गावी प्रयागराजला जात होते. दरम्यान ट्रेनमध्येच महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या व तिने गोंडस बाळाला जन्म दिला.

नंद बिहारी मीना, आलोक शर्मा, राजकरण यादव आणि इंद्र कुमार मीणा यांच्यासह सर्व तपास कर्मचाऱ्यांच्या कौतुकास्पद कार्याचे आम्ही विशेष अभिनंदन करतो ज्यांनी लोकांचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी तत्पर प्रतिसाद दाखवला आहे.  त्यांची निःस्वार्थ सेवा हे मानवतेचे एक ज्वलंत उदाहरण आहे आणि हे निरंतर कर्तव्यापलीकडे जाते.

उरण-नेरुळ लोकलमध्ये महिलेची प्रसूती -

यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात मुंबईतील उरण– नेरुळ लोकलने प्रवास करणाऱ्या उरणमधील एका महिलेची चालत्या लोकल मध्येच प्रसूती झाली होती. यात या महिलेला मुलगी झाली. यावेळी जनरल बोगीतील महिला आणि मुलींनी मदतीचा हात पुढे करीत प्रसूत झालेल्या महिलेला मदत केली. तर प्रवाशांनी लोकल चालकाला संपर्क साधला. त्यामुळे नेरुळ स्थानकात रेल्वे पोलिसांच्या सहकार्याने महिलेला रुग्णवाहिकेतून नेरुळ येथील मीनाताई ठाकरे रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिला पोलिसांच्या मदतीने महिलेची यशस्वी प्रसूती झाली होती. या महिलेचे पती उरणमध्ये मोलमजुरी करतात.

IPL_Entry_Point