मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Suicide Case : हुंडा कमी दिला म्हणून सुनेची छळवणूक; सासरच्या जाचाला कंटाळून महिलेची आत्महत्या
Parbhani Suicide Case
Parbhani Suicide Case (HT)

Suicide Case : हुंडा कमी दिला म्हणून सुनेची छळवणूक; सासरच्या जाचाला कंटाळून महिलेची आत्महत्या

11 January 2023, 14:16 ISTAtik Sikandar Shaikh

Suicide Case : लग्नात हुंडा कमी दिल्यामुळं पती आणि सासूनं सोनालीचा छळ करायला सुरुवात केली होती. त्यानंतर दररोजच्या जाचाला कंटाळून सोनालीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

Parbhani Suicide Case : लग्नात हुंडा कमी दिला म्हणून नाराज झालेल्या सासरच्या लोकांनी विवाहितेची छळवणूक केल्यानंतर महिलेनं टोकाचं पाऊल उचलून आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. परभणीतील साईबाबानगरमध्ये ही भयंकर घटना घडली असून त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणात मयत सोनाली ढोलेचा आरोपी पती आणि सासूविरोधात गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वीच महिलेचं लग्न झालं होतं, त्यामुळं आता सासरच्यांच्या त्रासाला कंटाळून विवाहितेनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आल्यानंत परभणीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली नावाच्या तरुणीचं काही दिवसांपूर्वीच परभणीतील विकास ढोले या तरुणीशी विवाह झाला होता. लग्नानंतर ते साईबाबानगरमध्ये रहायला आले होते. लग्नात कमी हुंडा दिला म्हणून ढोले कुटुंबियांनी सोनालीला शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली होती. सोनालीनं याबाबत तिच्या घरच्यांना कळवलं होतं. परंतु तरीदेखील सासरच्या लोकांनी सोनालीला त्रास देणं सुरुच ठेवलं. त्यामुळं जाचाला कंटाळलेल्या सोनालीनं घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर या घटनेची माहिती समजताच स्थानिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. 

शहरात महिलेनं आत्महत्या केल्याची घटना समजताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत प्रकरणाची चौकशी सुरू केली. त्यानंतर सोनालीचा आरोपी पती विकास ढोले आणि सासू फुलाबाई ढोले यांना पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला असून सोनालीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नांदगावकर हे करत आहेत. याशिवाय सोनालीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे.