सैन्य दलात नोकरीला असलेल्या प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार पिंपरी चिंचवड शहरातून समोर आला आहे. आळंदी पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील चिंबळी येथे ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे आरोपींचा मृताच्या १ कोटी रुपयांच्या टर्म इन्शुरन्सवर डोळा होता. ते पैसे ते तिघेजण वाटून घेणार होते.
राहुल सुदाम गाडेकर (३६) असे हत्या झालेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी राहुलची पत्नी सुप्रिया राहुल गाडेकर आणि तिचा प्रियकर सुरेश मोटाभाऊ पाटोळे तसेच त्याचा सहकारी रोहिदास सोनवणे अशा तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. सुरेश पाटोळे भारतीय सैन्य दलात कार्यरत असल्याचे सांगण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत राहुल गाडेकर यांच्या पत्नीने सुप्रिया हिने गेल्या दोन वर्षापासून संगमनेर तालुक्यातील निमगाव पांगा येथे एक लॅब सुरू केली आहे. तेथे तिचे सैन्य दलात नोकरीला असलेल्या सुरेश पाटोळे याच्यासोबत सूत जुळले. याची माहिती पती राहुलला समजल्यानंतर पती-पत्नीमध्ये नेहमी भांडणे होत होती. त्यानंतर सुप्रियाने प्रियकराच्या मदतीने पतीचा कायमचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.
सुरेश पाटोळे सैन्य दलातून सुट्टीवर आल्यावर त्याने राहुलच्या हत्येसाठी दोन लोखंडी हातोडे विकत घेतले होते. त्याचबरोबर पोलिसांनी सांगितले की, राहुल गाडेकर यांनी स्वतःचा एक कोटी रुपयांचा टर्म इन्शुरन्स काढला होता. याची माहिती पत्नी सुप्रियाला होती. राहुलच्या मृत्यूनंतर निम्मे पैसे तिने सुरेश व त्याच्या साथीदाराला देण्याचे कबूल केले होते. त्यानंतर राहुल गाडेकर हा चाकण येथील कंपनीत कामाला जात असताना आरोपी सुरेश पाटोळे आणि रोहिदास घाडगे यांनी पाठीमागून त्याच्या डोक्यात लोखंडी हातोड्याने वार करून त्याची हत्या केली.
राहुलची हत्या केल्यानंतर आरोपी सुरेश नोकरीवर रुजू झाला. तर रोहिदास चिंचपूर गावात आपल्या घरी निघून गेला होता. मात्र पोलिसांना पत्नीवर संशय आल्याने त्यांनी तिची चौकशी केली. पोलिसी खाक्या दाखवताच तिने आपला गुन्हा कबूल केला. या हत्या प्रकरणातील तीनही आरोपींना अटक केली असून त्यांच्या विरोधात आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नोंद करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या