दर्जेदार साहित्यिक चर्चांमुळे अल्पावधीत प्रसिद्ध झालेले जयपूर लिटरेचर फेस्टिवलचे १७वे पर्व येत्या १-५ फेब्रुवारी २०२४ दरम्यान पार पडणार आहे. या महोत्सवाची माहिती देण्यासाठी महोत्सवाचे सह-संचालक तसेच प्रसिद्ध लेखक, इतिहासकार विल्यम डॅलरीम्पल आवर्जून उपस्थित होते. यावेळी मुंबईतील मान्यवर लेखक आणि महोत्सवातील वक्ते खास उपस्थित होते.
‘जयपूर लिटरेचर फेस्टिवलचा मापदंड दरवर्षी अधिक उंचीवर नेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतोच. परंतु २०२४ सालातील महोत्सव आजवरचा सर्वोत्तम ठरणार आहे. हा महोत्सव असामान्य होणार आहे’ अशी माहिती विल्यम डॅलरीम्पल यांनी यावेळी दिली. ‘जयपूर लिटरेचर फेस्टिवल हा साहित्यातील आनंद साजरा करणारा हा महोत्सव असतो. आम्ही कथाकथनाच्या शक्तीद्वारे लोकांना प्रेरणा देत असतो. कला, ज्ञान आणि नवोन्मेषाच्या आदानप्रदानात सहभागी होण्याची ही संधी आहे.’ अशी माहिती जयपूर लिटरेचर फेस्टिवलचे निर्माते टीमवर्क आर्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक संजॉय के. रॉय यांनी दिली.
‘कोरम’मधील कार्यक्रम संचालक सलोनी पुरी यांनीही यावेळी आपलं मत मांडलं. जयपूर लिटरेचर फेस्टिवलच्या पहिल्या वर्षापासून त्यांची महोत्सवाला उपस्थिती असते. या महोत्सवातील वैविध्यपूर्ण कार्यक्रम देशाच्या सांस्कृतिक संभाषणात मोलाची भर घालतात. कोरम आणि जयपूर लिटरेचर फेस्टिवलची जातकुळी एकच असल्याचं पुरी यांनी सांगितलं.
यंदाच्या जयपूर लिटरेचर फेस्टिवलमध्ये कला व संस्कृती हे प्रमुख विषय असणार आहेत. भारतातील आद्य आधुनिक कलावंत राजा रविवर्मा ह्यांच्या कलेतील अलौकिकता उलगडणाऱ्या सत्राचा ह्यामध्ये समावेश आहे. गणेश व्ही. शिवस्वामी ह्यांच्या राजा रवि वर्मा: अॅन एव्हरलास्टिंग इम्प्रिण्ट ह्या सहा खंडांच्या मालिकेतील दोन खंडांच्या माध्यमातून राजा रवि वर्मा ह्यांचे आयुष्य, कलात्मक शैली आणि त्यांच्या सर्जनशील प्रवासाची कायमस्वरूपी छाप ह्यांचा वेध घेतला जाणार आहे. दुसऱ्या एका सत्रात कला इतिहासकार आणि कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीतील फिट्झविल्यम म्युझियमचे संचालक ल्युक सायसन लिओनार्दो दा विंची ह्यांच्या एक शोधक व शास्त्रज्ञ म्हणून असलेल्या लौकिकाबद्दल तसेच एक चित्रकार म्हणून असलेल्या त्यांच्या ध्येयांचे व तंत्रांचे महत्त्वही काहीवेळा झाकोळून टाकणाऱ्या सर्जनशीलता व व्यक्तिमत्वांतील जटीलतेबद्दल बोलणार आहेत. लिओनार्दो दा विंची- पेण्टर अॅट द कोर्ट ऑफ मिलान हे सायसन ह्यांचे प्रशंसाप्राप्त पुस्तक, रेनेसाँ काळातील सर्वाधिक लोकप्रिय कलावंतांपैकी एक असलेल्या लिओनार्दो ह्यांचा जटील स्वभाव समजून घेण्याचा प्रयत्न आहे.
चरित्रे ह्या विषयामध्ये, इरफान: ए लाइफ इन मुव्हीज ह्या चित्रपट समीक्षक व लेखक शुभ्रा गुप्ता ह्यांनी लिहिलेल्या पुस्तकावरील सत्राचा समावेश आहे. दिवंगत इरफान या अभिनेत्याच्या समकालीन कलावंतांशी झालेल्या संभाषणांचा तसेच त्यांनी सांगितलेल्या इरफान ह्यांच्या आठवणींचा संग्रह ह्या पुस्तकात आहे. इरफान खान ह्यांच्या पत्नी व रंगभूमीवरील कलावंत सुतपा सिकदर आणि चित्रपटकर्ते विशाल भारद्वाज ह्यांच्याशीही ह्या सत्रादरम्यान संवाद साधला जाणार आहे. आणखी एका सत्रात पुलित्झर पारितोषिक विजेते लेखक काइ बर्ड त्यांच्या लेखक म्हणून जगलेल्या आयुष्यावर तसेच साहित्यिक प्रवासावर बोलणार आहेत. दिवंगत मार्टिन जे. शेरविन ह्यांच्यासोबत सहलेखक म्हणून काम केलेल्या बर्ड ह्यांनी अमेरिकन प्रोमेथिअल- द ट्रायम्फ अँड ट्रॅजेडी ऑफ जे. रॉबर्ट ओपनहायमर हे पुस्तक लिहिले आहे. त्यावरूनच प्रेरणा घेऊन दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलान ह्यांनी ‘ओपनहायमर’ हा सध्या जगभरात गाजत असलेला चित्रपट केला आहे.
शर्मिष्ठा मुखर्जी ह्यांच्या ‘प्रणब माय फादर: अ डॉटर रिमेम्बर्स’ ह्या लक्षणीय चरित्रातून ज्येष्ठ राजकीय नेते आणि भारताचे तेरावे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी ह्यांच्या विलक्षणय आयुष्याची झलक बघायला मिळते. या सत्रात शर्मिष्ठा त्यांच्या कामाप्रती समर्पित व अत्यंत धार्मिक पित्याबद्दल बोलणार आहेत. पुरस्कारप्राप्त अनुवादक आणि लेखक रक्षंदा जलील ह्यांचे ‘बाल ओ-पार’ हे गुलझार यांच्या समग्र काव्याचा अनुवाद आहे. सहा खंडांतील कवितांचा हा अनुवाद आहे. हे दोघे मिळून आपल्याला ह्या अप्रतिम कलाकृतीचा परिचय करून देणार आहेत. इतिहास, मानवी अनुभव व काव्यात्मक अभिव्यक्ती ह्यांचे दर्शन घडवणार आहेत.
ह्या महोत्सवात फॅशन डिझायनर तरुण ताहिलियानींच्या कामाचाही समावेश करण्यात आला आहे. त्यांची निर्मिती शिवणकामाच्या इतिहासातून वाट काढणारी आहे. जागतिकीकरण आणि वसाहतवादाचा पोशाखावर होणारा प्रभाव ते विस्मृतीत गेलेल्या तंत्रांचे पुनरुज्जीवन हे सर्व काही त्यांच्या कामात दिसून येते. शोध पत्रकार अलिया अलाना ह्यांच्या सोबत त्यांनी लिहिलेल्या जर्नी टू इंडिया मॉडर्न ह्या पुस्तकातून त्यांनी आपल्या कौशल्यांसाठी निवडलेले मार्ग आणि आजच्या जगात स्वत:च्या लग्झरी डिझाइन स्टुडिओचे महत्त्व हे सर्व काही उलगडले जाते. टीव्ही सूत्रसंचालक व फॅशन कन्सल्टण्ट अंबिका आनंद ह्यांच्याशी होणाऱ्या संवादाद्वारे ताहिलियानी जगभरातील फॅशनच्या शोधातून मिळालेल्या माहितीबाबत, वेळ व स्थळाच्या सीमा ओलांडून काही सांगण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबाबत आणि आपल्या डिझाइन्सच्या माध्यमातून उभ्या केलेल्या प्रश्नांबाबत, सांगणार आहेत.
सोहळ्यामध्ये सर्वाधिक खपाच्या पुस्तकांचे लेखक, मुत्सद्दी आणि लंडनमधील नेहरू सेंटरचे संचालक अमीष आणि महोत्सवाचे निर्माते तसेच टीमवर्क आर्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक संजॉय के रॉय ह्यांनी परस्परांशी संवाद साधला. महोत्सवातर्फे २०२४ सालातील पर्वासाठी अधिकृत बुकस्टोअर म्हणून क्रॉसवर्ड बुकस्टोअर्सची घोषणा करण्यात आली. पर्क्युशनिस्ट व्लादिमिर टॅराव्होस आणि सेक्साफोनिस्ट ल्युडास मोक्युनास ह्यांनी ह्या सोहळ्यादरम्यान रोमांचक जाझ सादरीकरण केले.
संबंधित बातम्या