Maharashtra Politics : भाजपचे सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची केंद्रिय मंत्रिमंडळात निवड झाल्याने भाजप त्यांना पक्षाच्या जबाबदारीतून मुक्त करणार आहे. अशा स्थितीत पक्षाचा नवा अध्यक्ष कोण होणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. तसेच या पदासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर आहे. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीच्या राजकारणात जाणार की महाराष्ट्रात? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी एका वाक्यात उत्तर दिलं.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'राजकारण हा अनिश्चितेतचा निश्चित खेळ आहे. त्यामुळे राजकारणात उद्या काय घडेल, हे सांगता येत नाही. मात्र. तुम्ही जो प्रश्न ज्या अनुषंगाने विचारलात त्यांचे उत्तर मी एकाच वाक्यात देईन. मी येथेच आहे.' म्हणजेच देवेंद्र फडणवीस हे कुठेही जाणार नाही, हे स्पष्ट झाले. महाराष्ट्राच्या राजकारणात कटुता कशी दूर होईल, या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, 'माध्यमं यासाठी जबाबदार आहे. दररोज सकाळी ९ वाजता एक तुम्ही एक चेहरा दाखवता. तिथूनच सगळी कटुता सुरू होते आणि दिवसभर तेच सुरू राहते. तो चेहरा दाखवणे बंद करा, मग अवघ्या आठ राज्यातील कुटता दूर होईल', असे टोला फडणवीस यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता लगावला आहे.
देवेंद्र फडणवीस यांचे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चांगले संबंध आहेत. याशिवाय, मोहन भागवत यांच्याशी त्यांचे संबंध चांगले आहेत, त्यामुळेच ते भाजप अध्यक्षपदासाठी योग्य उमेदवार मानले जाऊ शकतात. फडणवीस यांच्या नावाची राजकीय वर्तुळात जोरात चर्चा होत असली तरी अद्याप पक्षाकडून यावर कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही. भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये भूपेंद्र यादव आणि धर्मेंद्र प्रधान यांचाही समावेश आहे. त्यांचेही नाव अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहे. मात्र, ही जबाबदारी कोणाला मिळते? हे येणारा काळच सांगेल.
देवेंद्र फडणवीस यांनी २७ जुलै २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पत्नी अमृता आणि मुलगी दिविजा यांच्यासह फडणवीस यांनी पंतप्रधानांशी झालेल्या भेटीचे वर्णन 'सौजन्य भेट' असे केले. मोदींची भेट घेतल्यानंतर फडणवीस म्हणाले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्रावर नेहमीच आशीर्वाद राहिला आहे आणि भविष्यातही राहीन. मी जेव्हा- जेव्हा त्यांना भेटतो, तेव्हा मला नवीन ऊर्जा आणि त्यांचे मार्गदर्शन मिळते.आज मला माझ्या कुटुंबासमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची संधी मिळाली. माझी पत्नी अमृता आणि मुलगी दिव्या माझ्यासोबत होत्या. मला आपला मौल्यवान वेळ दिल्याबद्दल मी माननीय पंतप्रधानांचा खूप आभारी आहे.’
डिसेंबर २०२४ पर्यंत नवीन राष्ट्रीय अध्यक्षाची नियुक्ती करण्याचा पक्षाचा विचार असून त्यासाठी 1 ऑगस्टपासून निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे, अशी माहिती पीटीआयने दिली आहे. निवडणुकीपूर्वी पीटीआयने म्हटले होते की, पक्ष व्यापक सदस्यता मोहीम राबवणार आहे आणि जिल्हा आणि राज्य युनिटमजबूत करण्यासाठी काम करणार आहे. १ डिसेंबरपासून प्रदेशाध्यक्षांची निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे. ५० टक्के राज्यांच्या निवडणुका पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष निवडीची अधिकृत प्रक्रिया सुरू होईल.
संबंधित बातम्या