शिवसेनेवर खरा हक्क एकनाथ शिंदे यांचाच असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्यानं विधीमंडळाशी संबंधित प्रत्येक बाबतीत आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाच्या सर्व आमदारांना एकनाथ शिंदे गटाचा व्हीप पाळावा लागणार आहे.
शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणावर व अन्य वादावर निकाल देणारे राहुल नार्वेकर यांनी स्वत: 'हिंदुस्तान टाइम्स'ला ही माहिती दिली आहे. विधीमंडळ पक्षाच्या प्रत्येक सदस्याला अधिकृत पक्षाच्या व्हीपनं दिलेला आदेश पाळावाच लागणार आहे. विधीमंडळाच्या सभागृहात शिवसेना हा एकच पक्ष आहे. शिवसेनेच्या दुसऱ्या गटाला तिथं अधिकृत मान्यता नाही. त्यामुळं मूळ पक्षाचा जो कोणी सदस्य असेल त्याला आदेश पाळणं बंधनकारक आहे, असं नार्वेकर म्हणाले.
अर्थात, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे १६ आमदारांना राज्य विधानसभेच्या कामकाजात जेव्हा-केव्हा भाग घेतील, तेव्हा त्यांना शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या आदेशाचं पालन करावं लागेल. त्यात विधानसभेत भूमिका मांडणं, सरकारनं सादर केलेल्या विधेयकांच्या बाजूनं मतदान करणं आणि पक्षाच्या विधिमंडळातील गटाच्या बैठकांना उपस्थित राहणं यांचा समावेश आहे.
राहुल नार्वेकर यांच्या या वक्तव्यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे मुख्य व्हीप सुनील प्रभू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'कुठल्याही पक्षाचा व्हीप हा राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान लागू होतो. सध्या विधानसभेचं कुठलंही अधिवेशन सुरू नाही. त्यामुळं नार्वेकर यांच्या दाव्यावर पक्ष कायदेशीर सल्ला घेईल आणि त्यानंतरच पुढची भूमिका ठरवेल, असं प्रभू म्हणाले.
ठाकरेंच्या शिवसेनेचे दुसरे आमदार भास्कर जाधव यांनी यावर आक्रमक भूमिका मांडली. ‘आपण जे सांगितलं तेच अंतिम सत्य असं राहुल नार्वेकर यांना वाटतं, पण ते तसं नाही. सर्वोच्च न्यायालय अजून आहे. ते यावर अंतिम निर्णय घेईल, असं जाधव म्हणाले. 'नार्वेकर अशी विधानं आम्हाला भीती दाखवण्यासाठी करत असावेत. शिंदे गटात सहभागी न झाल्यास आम्हाला अपात्र ठरवण्यात येईल, अशी अप्रत्यक्ष धमकी ते देत आहेत, असंही भास्कर जाधव म्हणाले.
शिवसेनेच्या प्रकरणात निकाल देताना ठाकरेंच्या आमदारांना अपात्र का ठरवलं नाही याचा खुलासाही राहुल नार्वेकर यांनी हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना केला. 'व्हीपचं उल्लंघन केल्याच्या आधारे कुठल्याही आमदारास अपात्र ठरवायचं असल्यास तो व्हीप योग्य व्यक्तींन दिला आहे का आणि तो संबंधित आमदारांना प्रत्यक्ष दिला गेला आहे का, हे तपासावं लागतं. ठाकरेंच्या आमदारांना व्हीप जारी करण्यात आल्याचा कोणताही पुरावा शिंदे गटाकडं नाही. त्यामुळं ठाकरेंच्या आमदारांना अपात्र ठरवणं मला शक्य नव्हतं, असं नार्वेकर यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या