pune narhe murder : पुण्यात गुन्हेगारीने कळस गाठला आहे. किरकोळ कारणावरून एकमेकांच्या जिवावर उठून खुनाच्या घटना वाढल्या आहे. अशीच एक घटना नऱ्हे येथे उघडकीस आली आहे. एका पत्नीने मद्यपी पतीच्या त्रासाला कंटाळून त्याच्या पोटात स्वयंपाक घरातील चाकू पोटात खुपसून त्याची हत्या केली आहे. रविवारी संध्याकाळी ही घटना घडली. पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे.
किरपा बिप्त (वय ४२, मूळ रा. नेपाळ) असे खून झालेल्या मद्यपी पतीचे नाव आहे. तर हिरा बिप्त (वय ४६) असे आरोपी पत्नीचे नाव आहे. हिराला सिंहगड रस्ता पोलिसांनी रात्री अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिप्त कुटुंबीय मूळचे नेपाळमधील आहेत. ते सध्या नऱ्हे येथील मानाजीनगर परिसरातील स्वप्नपूर्ती रेसीडन्सी सोसायटी येथे रखवालदार म्हणून काम करत होते. किरपाला दारूचे व्यसन होते. तो दारु पिऊन पत्नी हिराला मारहाण करायचा. तसेच रोज तिचा छळ करायचा. या कारणावरून त्यांच्यात रोज भांडण व्हायचे. रविवारी संध्याकाळी देखील किरपा हा दारू पिऊन घरी आला. यावेळी त्याने पत्नी हिराला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावरून दोघांमध्ये मोठे वाद झाले. या वादातून घरातील चाकूने हिराने पती किरपावर वार केले. तिने किरपाच्या पोटात चाकू भोसकला. या घटनेत किरपा हा गंभीर जखमी झाला. त्याचा जागीच मृत्यू झाला. किरपाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
दरम्यान, सिंहगड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्र क्षीरसागर यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच आरोपी पत्नी हिराला रात्री उशीरा अटक करण्यात आली. या हत्ये प्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.