मुंबईतील मालाड येथे हत्येचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. एका विवाहितेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली. दोघांनी आधी पतीला भरपूर दारू पाजली त्यानंतर त्याच्यावर चाकूने वार करत त्याची हत्या केली. हत्येनंतर मृतदेह मोटारसायकलीवरून नेऊन दुर्गम ठिकाणी फेकून दिला. त्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन महिलेने पती बेपत्ता झाल्याचा बनाव करत तक्रार दाखल केली.
ही घटना मालाड पश्चिम मालवणीमध्ये घडली. शनिवारी रात्री मृत राजेश चौहानची पत्नी पूजा आणि तिचा प्रियकर इमरान मंसूरी मालवणी पोलीस ठाण्यात गेले व त्यांनी राजेश बेपत्ता झाल्याचे सांगून त्याचा फोटा पोलिसांना दिला. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊत तत्काळ तपास सुरू केला. एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये राजेश आपली पत्नी व इम्रान सोबत बाइकवरून जाताना दिसला. यावरून पोलिसांना संशय आला.
संशयावरून पोलिसांनी पूजा आणि इम्रानला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनी आपला गुन्हा कबूल केला. घरातच हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो बाईकवरून नेऊन निर्जनस्थळी फेकल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून घटनास्थलावरून रक्ताने माखलेला चाकू आणि कपडेही जप्त केले आहेत.
मिळालेल्या माहितीवरून मृत राजेश हा मालवणी येथे पत्नी पूजा, १० वर्षांची मुलगी आणि आठ वर्षाच्या मुलासह भाड्याच्या घरात रहात होता. तीन महिन्यांपूर्वी त्याचा मित्र इम्रान मन्सूरी मुंबईत कामाच्या शोधात आला व त्यांच्यासोबतच राहू लागला. पूजा आणि इम्रानमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आणि दोघांनी एकत्र राहण्यासाठी राजेशच्या हत्येचा कट रचला. शनिवारी रात्री, पूजा आणि इम्रानने राजेशला मारण्याचे ठरवलं होतं. त्यांनी आधी राजेशला भरपूर दारू पाजली आणि नंतर मुलांसमोरच त्याचा चाकूने गळा चिरला.
हत्येनंतर आरोपींनी घरात सांडलेले रक्त चादरीने साफ केले. रक्ताने माखलेले आपले कपडे दोघांनी बदलले. घर पाण्याने स्वच्छ करून मृतदेह चादरीत गुंडाळून दुचाकीवरून सुमारे ५०० मीटर अंतरावर एका निर्जन ठिकाणी फेकला. त्यानंतर तसेच पोलीस ठाण्यात जाऊन पती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. मात्र पोलीस ठाण्यात महिलेचे बिंग फुटले व तिने आपला गुन्हा कबूल केला.
संबंधित बातम्या