Pune Somvarpeth crime news : पुण्यातील सोमवार पेठ येथे एक धक्कादाक घटना उघडकीस आली आहे. पतीने मोड आलेले हरभरे खाल्ले नाहीत, या कारणावरून पत्नीने पतीला लाटण्याने बेदम मारहाण केली. पत्नी एवढ्यावरच नाही थांबली तर तिने पतीच्या डोक्यात मिक्सरचे भांडे मारले. यानंतर पतीच्या करंगळीचा चावा घेऊन त्याच्या हाताचे नख तोडले. पत्नीने केलेल्या मारहाणीत पती हा गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी पत्नीने समर्थ पोलिस ठाण्यात जात तक्रार दिली असून मारक्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी पीडित पतीने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचे वृत्त असे की, पत्नीने पतीसाठी हरभरे भिजवले होते. रविवारी (१ डिसेंबर) भिजवलेले हरभरे तिने पतीला खायला दिले. मात्र, पतीने हे हरभरे खाल्ले नाही. यामुळे तिचे व तिच्या पतीचे भांडण झाले. हा वाद टोकाला पोहोचला. संतापलेल्या पत्नीने पतीला लाटण्याने बेदम मारहाण केली. पत्नीने पतीच्या डोक्यात लाटणे मारले. पत्नीच्या मारापासून वाचण्यासाठी पतीने हात वर केले. मात्र, यावेळी पत्नीने दुसऱ्या हाताने मिक्सरचे भांडे पतीच्या डोक्यात मारले.
पत्नी एवढ्यावरच थांबली नाही तर तिने पतीचा हात पकडत त्याच्या करंगळीला जोरदार चावा घेतला व नख तोडले. पत्नीने केलेल्या मारहाणीत पती हा जखमी झाला आहे. कसे बसे स्वत:ला पत्नीच्या तावडीतून सोडवून त्याने थेट समर्थ पोलीस ठाणे गाठले. पोलिसांना स्वत:वर बेतलेला प्रसंग कथन केला. यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच गंभीर दुखापत केल्याप्रकरणी ४० वर्षीय पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तर आणखी एका घटनेत पुण्यातील उत्तमनगर येथे पतीने पत्नीला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. पायगुडे चाळ परिसरात ही घटना घडली. एक दाम्पत्य या ठिकाणी राहायला असून आरोपी पती हा रिक्षा चालवतो. त्याच्या पत्नीने त्याला न सांगता त्याच्या रिक्षाचे हप्ते भरले. याच कारणावरून त्याने पत्नीला मारहाण केली. रिक्षाचे हप्ते मला न सांगता का भरले ? असा जाब विचारत त्याने पत्नीला शिवीगाळ करुन पोटात लाथ मारली. या प्रकरणी पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.