Beed News in Marathi : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर या जिल्ह्यात सुरू असलेला पवन चक्की उद्योग सध्या देशभरात सर्वाधिक चर्चेचा विषय झाला आहे. मस्साजोग या गावात असलेल्या 'अवाडा' कंपनीच्या पवन चक्कीच्या मालकाकडून खंडणी गोळा करण्यासाठी गेलेल्या काही आरोपींना मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांनी अटकाव केला होता. याचा राग डोक्यात ठेवून देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. बीड जिल्ह्यातून प्रवास करत असताना अनेक ठिकाणी उंचच्या उंच पवन चक्क्यांचे पाते फिरतानाचे दृष्य नजरेस पडते. मराठवाड्यात दुष्काळी समजल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्यात पवन चक्की प्रकल्प उभारण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात कसा उदयास आला, जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीचे खंडणीखोर लोक पवन चक्कीच्या या उद्योगात कसे घुसले, हे आपण जाणून घेणार आहोत.
हवेच्या दाबामुळे पवन चक्की फिरवून उत्पादित होणारी वीज ही जगभरात स्वच्छ स्त्रोतांद्वारे निर्मित वीज मानली जाते. पवन ऊर्जा निर्मितीमध्ये भारत हा जगातला चौथ्या क्रमांकाचा देश बनला आहे. पवन ऊर्जा निर्मितीसाठी भारतातील निवडक ३३९ सुयोग्य ठिकाणांपैकी ४० ठिकाणे ही महाराष्ट्रात आढळतात. भारताच्या पश्चिम आणि मध्य भूभागात वसलेले आणि अरबी समुद्राची सुमारे ८४० किलोमीटरची किनारपट्टी लाभलेल्या महाराष्ट्राचे हे भूस्वरुप पवन चक्क्यांना आवश्यक हवेच्या दाबासाठी योग्य मानले जाते.
राज्यात सध्या धुळे, सांगली आणि सातारा या पवन ऊर्जेसाठी आकांक्षित जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पवन ऊर्जा निर्मिती केली जात आहे. त्यामुळे पवन ऊर्जा क्षेत्रातील मातब्बर कंपन्यांनी आता बीड जिल्ह्याकडे आपला मोर्चा वळवला आहे. २०२२ साली राज्य सरकारने पवन ऊर्जा निर्मितीसाठीचे धोरण अधिक लवचिक केले आहे. त्यात अधिक नफा दिसू लागल्यामुळे एकट्या बीड जिल्ह्यात ३०० पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी कंपन्यांचे प्रस्ताव सरकारला प्राप्त झाले आहेत. ‘अवादा’ व्यतिरिक्त बीड जिल्ह्यात सध्या ‘इंडीग्रीड’, ‘कल्लम ट्रान्मिशन पॉवर’, ‘पनामा विंड एनर्जी’ आणि ‘रिन्यू विंड’ सारख्या कंपन्यांनी पवन चक्की प्रकल्प स्थापित केले आहे.
गेल्या काही वर्षात पवन चक्क्या उभारण्यासाठी बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक होताना दिसत आहेत. या प्रकल्पासाठीचे भूसंपादन, कच्च्या मालाचा पुरवठा, वाहतूक, बांधकाम साहित्य याची मोठ्या प्रमाणावर गरज निर्माण झाली असून यामुळे बीड जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेत चांगली आर्थिक भर पडलेली दिसते. तथापि या उलाढालीतून वाटा मिळवण्यासाठी जिल्ह्यात राजकीय वरदहस्त लाभलेले गुंड या पवन चक्क्यांच्या प्रकल्पाकडे आकर्षित झाले आहे.