बारामतीत नमो रोजगार मोळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र या मेळाव्याच्या कार्यक्रमात पत्रिकेमध्ये शरद पवारांचं नाव नाही. दोन मार्चला बारामतीतल्या विद्या प्रतिष्ठान मैदानावर नमो रोजगार मेळावा होत आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. राज्य सरकारकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रम पत्रिकेत खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण यांचं नाव आहे. शरद पवारांचं नाव मात्र या कार्यक्रमपत्रिकेत नाही, तसेच त्यांना निमंत्रणही दिलं नाही, यावर जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्टीकरण दिलं आहे.
या मेळाव्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा, विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे. या शासकीय कार्यक्रमासाठी पुणे पिंपरी चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील सर्व लोकप्रतिनिधी म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार आणि विधानसभा आणि विधान परिषदेचे आमदार यांना निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र या कार्यक्रमाचे निमंत्रण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना न दिल्याने तसेच कार्यक्रम पत्रिकेत त्यांचे नाव न घातल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती.
यावर जिल्हा प्रशासनाकडून खुलासा करण्यात आला आहे. हा शासकीय कार्यक्रम असल्यामुळे या कार्यक्रमासाठी पुणे जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रण देण्यात आले आहे. स्वतः शरद पवार यांनी राजशिष्टाचार विभागाला कोणत्याही शासकीय कार्यक्रमात माझे नाव टाकू नये, अशा स्पष्ट सुचना यापूर्वीच दिल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक शासकीय कार्यक्रमावेळी पवार यांचे नाव टाकण्यात येत नाही. त्यामुळे या कार्यक्रमातही नाव टाकण्यात आले नाही. मात्र आता पवार यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत टाकण्यात येईल आणि नवी निमंत्रण पत्रिका तयार करण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दरम्यान शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कार्यक्रमाला येणार असल्याचे कळवले आहे. शरद पवार यांनी म्हटले आहे की, महारोजगार मेळाव्याचे आयोजन मी संस्थापक अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठान, विद्यानगरी, बारामती येथील मैदानात करण्यात येत असल्याने संस्थेचा अध्यक्ष या नात्याने मी आपले संस्थेच्या प्रांगणात यथोचित स्वागत करू इच्छितो. सदर शासकीय कार्यक्रमाप्रसंगी संसद सदस्य नात्याने मला आणि सुप्रिया सुळे याना उपस्थित राहायला आवडेल.
संबंधित बातम्या