मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  PFIवर केंद्र सरकार बंदी का घालत नाही, काँग्रेसचा सवाल

PFIवर केंद्र सरकार बंदी का घालत नाही, काँग्रेसचा सवाल

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Sep 24, 2022 06:56 PM IST

Congress On PFI Protest: सरकारला पीएफआयच्या कारवायांची माहिती नव्हती का? केंद्र सरकार आजपर्यंत डोळे झाकून बसले होते का? असे प्रश्नही काँग्रेसने उपस्थित केले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

Congress On PFI Protest: दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवल्याच्या आरोपाखाली एनआयए, ईडी या केंद्रीय तपास यंत्रणांनी पुण्यासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी छापा टाकला. याप्रकरणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) संघटनेच्या अनेकांना ताब्यात घेण्यात आलं. यावेळी पुण्यात काही लोकांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याने आता राज्यात राजकीय वातावरणही तापलं आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेसने केंद्र सरकारला सवाल विचारला असून पीएफआयवर बंदी का घालत नाही असं म्हटलं आहे. पाकिस्तान जिंदाबाद घोषणा देणं हे अत्यंत निषेधार्ह आहे. अशा घोषणा देणाऱ्या व दहशतवाद्यांचे समर्थन करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. कोणतीही संघटना धार्मिक उन्माद घालत असेल तर त्यावर बंदी घातली पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, "राज्यात दहशतवादी कारवायांना कसलेही स्थान मिळता कामा नये, राज्यात शांतता राहिली पाहिजे हीच काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. महाराष्ट्रात अशा घटना घडू नयेत. अशा प्रवृत्तींना राज्यातून ताकद मिळते काय? हे तपासायला हवे. हिंदू- मुस्लीम वाद निर्माण करून कोणी आपली राजकीय पोळी भाजत आहे का ? याचीही सखोल चौकशी झाली पाहिजे."

पीएफआयवर बंदीची मागणी करताना नाना पटोले म्हणाले की," पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा खपवून घेतल्या जाणार नाहीत, त्या लोकांवर कडक कारवाई करा. परंतु UAPA कायद्यानुसार PFI सारख्या संघटनांवर बंदी घालण्याचे अधिकार केंद्र सरकारला आहेत. PFI वर बंदी घालण्याची मागणी काँग्रेस पक्षाने याआधीही केली होती पण केंद्रातील भाजपा सरकार त्यांच्या राजकीय फायद्यासाठी या संघटेवर बंदी घालत नाही का? केंद्रात आठ वर्षांपासून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे सरकार आहे, या सरकारला पीएफआयच्या कारवायांची माहिती नव्हती का? केंद्र सरकार आजपर्यंत डोळे झाकून बसले होते का? असे सवालही पटोले यांनी उपस्थित केले.

कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची असते पण ईडी सरकारच्या काळात राज्यात पोलिसांचा धाकच राहिलेला नाही. सत्ताधारी पक्षाचा आमदारच गोळीबार करतो, त्यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत काय ? असा सवाल पटोलेंनी विचारला.

राहुल गांधींच्या पदयात्रेमुळे देशातलं वातावऱण बदललं असल्याचं नाना पटोले म्हणाले. तसंच राहुलजी गांधी यांच्या पदयात्रेची भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही दखल घ्यावी लागली म्हणून तर सरसंघचालक मोहन भागवत यांनी मशिदीत जाऊन इमाम इलिसायी यांची भेट घेतली, त्यांच्या या भूमिकेचे आम्ही स्वागतच करतो असं नाना पटोले म्हणाले.

WhatsApp channel

संबंधित बातम्या