मोदी सरकारनं युद्धनौकेला 'सुरत' नाव का दिलं? ठाकरेंच्या शिवसेनेनं बांधला असा अंदाज
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मोदी सरकारनं युद्धनौकेला 'सुरत' नाव का दिलं? ठाकरेंच्या शिवसेनेनं बांधला असा अंदाज

मोदी सरकारनं युद्धनौकेला 'सुरत' नाव का दिलं? ठाकरेंच्या शिवसेनेनं बांधला असा अंदाज

Jan 17, 2025 12:45 PM IST

Saamana Slams Narendra Modi : नौदलाच्या नव्या युद्धनौका राष्ट्रार्पण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणावर ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र दैनिक सामनातून सडकून टीका करण्यात आली आहे.

मोदी सरकारनं युद्धनौकेला 'सुरत' नाव का दिलं? ठाकरेंच्या शिवसेनेनं बांधला असा अंदाज
मोदी सरकारनं युद्धनौकेला 'सुरत' नाव का दिलं? ठाकरेंच्या शिवसेनेनं बांधला असा अंदाज

Shiv Sena UBT Slams PM Modi : भारतीय नौदलाच्या ताफ्यात नुकत्याच 'सुरत' आणि 'निलगिरी' या युद्धनौका दाखल झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितात या युद्धनौकांचा जलावरण सोहळा झाला. मोदींनी या दौऱ्यात केलेलं भाषण आणि युद्धनौकेच्या नावावरून ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'तून जोरदार टोलेबाजी करण्यात आली आहे.

'मोदींनी ब्रह्मज्ञान दिले' या शीर्षकाखाली सामनात अग्रलेखात लिहिण्यात आला आहे. त्यात मोदींच्या भाषणावर भाष्य करण्याआधी एका युद्धनौकेचं नाव 'सुरत' असल्यावरून उपरोधिक टीका करण्यात आली आहे. 'युद्धनौकेला दिलेलं ‘सुरत’ हे नाव आम्हाला बेहद्द पसंत पडलं. महाराष्ट्रात ‘ठाकरे’ सरकार पाडण्यासाठी शिवसेनेचे आमदार सुरत इथं पळवून नेले व तिथंच पैशांची वगैरे सौदेबाजी झाली. राजकारणात ती घडामोड ‘सुरत सौदा’ म्हणून बदनाम आहे. या घडामोडी सदैव स्मरणात राहाव्यात म्हणून नौकेला ‘सुरत’ असं नाव दिलं असावं, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

मोदींच्या भाषणाची खिल्ली

महायुतीच्या आमदारांसमोर बोलताना मोदी यांनी स्वत:ची व पक्षाची प्रतिमा जपण्याचा सल्ला दिला होता. त्यावरून अग्रलेखातून टोला हाणला आहे. 'प्रतिमा जपा असं मोदी म्हणतात, पण भाजपच्या प्रतिमेच्या साफ चिंधड्या उडाल्या आहेत. प्रतिमा जपा म्हणजे भ्रष्टाचार, स्वैराचार करू नका. प्रत्यक्षात मोदी यांनी महाराष्ट्रात सर्व भ्रष्टाचारी व लफडेबाज लोकांची मोट बांधून विधानसभेत विजय मिळवला आहे. स्वतः मोदी यांनी ज्यांच्या प्रतिमांचं भंजन केलं असं अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे लोक आज भाजपचे समर्थक आहेत. एकनाथ शिंदे यांनी भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून माया जमा केली व मोदी त्यांच्या पाठीवर थाप मारताना दिसतात. अशोक चव्हाणांच्या ‘आदर्श’ घोटाळ्यावर अमित शहा-मोदी प्रश्नचिन्ह उपस्थित करतात व त्याच चव्हाणांना मोदी भाजपात प्रवेश देतात. त्यामुळं प्रतिमा जपा म्हणजे काय?, असा प्रश्न ठाकरेंच्या शिवसेनेनं उपस्थित केला आहे.

मोदी महागडे मशरूम खातात असं कळतं!

साधे राहा असा सल्ला मोदींनी दिला आहे. पण या साधेपणाची सुरुवात कोणापासून करायची. साधेपणाचे मंत्र देणारे व तितक्याच साधेपणानं राहणाऱ्या गांधीजींचा मोदी द्वेष करतात. देशात गरिबी आहे व लोकांना अंगभर वस्त्र नाहीत म्हणून बॅ. गांधी यांनी सर्व सुखे त्यागली आणि वस्त्रही त्यागून आयुष्यभर एक पंचा परिधान केला. भाजपात हा साधेपणा औषधालाही उरला काय? नरेंद्र मोदी दहा लाखांचा सूट, पाच-दहा लाखांचा पेन, २० हजार कोटींचे विमान वापरतात. कांती तुकतुकीत राहावी म्हणून महागडे मशरूम खात असल्याची माहिती समोर आली. मोदींच्या ताफ्यात विदेशी गाड्या आहेत. ३५० कोटींचा पॅलेस पंतप्रधान मोदींसाठी दिल्लीत उभारला जात आहे. हे काय साधेपणाचं लक्षण मानायचं?, असा प्रश्नही अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.

भाजपच्या खात्यावरचे ६ हजार कोटी मजुरीचे आहेत का?

'भाजपचे लोक मिळेल त्या मार्गानं पैसा कमवतात. भाजपच्या खात्यावर ६ हजार कोटी रुपये जमा आहेत ते काय कार्यकर्त्यांनी मजुरी करून मिळवून दिले आहेत का? दिल्लीत भाजपचं पंचतारांकित मुख्यालय उभं आहे व देशातील जिल्ह्या-जिल्ह्यात भाजपची ‘टकाटक’ कार्यालयं उभी राहिली ती कोणाच्या पैशांवर? महाराष्ट्राच्या विधानसभेत भाजप व त्यांच्या मित्र गटांनी पैशांचा धो धो पाऊस पाडला. त्यामुळं देशाची प्रतिमाच उद्ध्वस्त झाली. बडेजाव हेच मोदींच्या राजकारणाचं सूत्र आहे. मोदी जे बोलतात त्याच्या नेमके विपरीत वागतात, अशी टीकाही करण्यात आली आहे.

दिव्याखाली अंधार!

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या मुंबई दौऱ्यात भाजप, शिंदे आणि अजित पवार गटाच्या आमदारांना कुलाब्यातील ‘आयएनएस आंग्रे सभागृहा’त मार्गदर्शन केलं. तिथं त्यांनी आमदारांबरोबर भोजनदेखील केलं. नौदलाच्या म्हणजे संरक्षण दलाच्या जागेत राजकीय मेळावे घेण्यास मान्यता आहे काय? जर ती असेल तर इतर राजकीय पक्षांनी त्यांचे मेळावे, बैठका, शिबिरे घेण्याची मुभा आयएनएस आंग्रे इथं आहे काय? या सभागृहात जे चहापान, भोजन वगैरे राजकीय कारणांसाठी झालं त्याचं बिल कोणी भरलं? मोदीसाहेबांनी प्रतिमा व नैतिकतेवर भाषण केलं म्हणून हे नैतिक प्रश्न आमच्या मनात निर्माण झाले! मोदींनी त्यांच्या लोकांना ब्रह्मज्ञान दिलं, पण सत्य काय आहे? दिव्याखाली अंधारच आहे, असा बोचरा टोलाही अग्रलेखात हाणला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर