राज्यात देशी गायींच्या संख्येत घसरण झाल्याने त्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने आज काही उपाययोजना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार राज्यात देशी गायींना ‘राज्यमाता-गोमाते’चा दर्जा जाहीर करण्यात आला आहे. शिवाय गोशाळांमध्ये दाखल केलेल्या गायींना प्रती गाय प्रती दिन ५० रुपये अनुदान देण्यात येणार आहे. देशी गायींच्या दुधात ए २ प्रोटिन असल्याने परिपूर्ण अन्न म्हणून गणले जाते. त्यामुळे शहरी भागात गायीच्या दुधाची मागणी वाढत आहे. परंतु राज्यात देशी गायींपासून अल्प प्रमाणात मिळत असलेलं दूध आणि चारा आणि पशुखाद्यावर होणारा अधिकचा खर्च पाहता या गायींच्या संगोपनाकडे शेतकऱ्यांचा फारसा कल दिसून येत नाही. २०१९ साली झालेल्या पशुगणनेनुसार महाराष्ट्रात देशी गायींची संख्या ४६ लाख १३ हजार ६३२ इतकी होती. त्यापूर्वी २०१२ साली झालेल्या पशुगणनेच्या तुलनेत २०१९ सालात महाराष्ट्रात गायींची संख्या २०.६९ टक्क्यांनी कमी झाल्याचे आढळून आले आहे.
राज्यात देशी गायींचं संवर्धन व्होऊन त्यांची संख्या वाढावी यासाठी राज्य सरकारकडून पुणे येथील कृषी महाविद्यालयात ‘देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र’ चालवण्यात येतं. प्रामुख्याने जास्त दूध देणाऱ्या साहिवाल, गीर, राठी, थारपारकर आणि रेडशिंदी या भारतातील देशी गायींच्या संवर्धनाबाबत या केंद्रात संशोधन कार्य चालतं. या केंद्रामध्ये प्रमुख शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत डॉ. सोमनाथ माने यांच्याशी याबाबत केलेली बातचित.
राज्याच्या ग्रामीण भागात शेतीकामासाठी मुबलक कामगार मिळेनासे झाले आहे. पशुपालन हा श्रम केंद्रित व्यवसाय असल्याने कामगारांची आवश्यकता असते. ग्रामीण भागात अनेक शेतकऱ्यांची देशी गायी पाळण्याची इच्छा असताना देखील पुरेशा कामागारांच्या अभावी ते शक्य नसल्याचे दिसून आले आहे.
देशी गायीच्या दुधाचे अनेक फायदे आहेत. ‘आईच्या दुधानंतर गायीचं दूध’ असं ग्रामीण भागात म्हटलं जातं. गायीच्या दुधात ए२ प्रोटिन असल्यामुळे मानवी शरीरासासाठी त्यात अनेक पोषक घटक असतात. राज्यात काही शहरांमध्ये गायीच्या दुधाला ८० रुपये प्रती लिटर आणि गायीच्या तुपाला २८०० रुपये प्रती किलो दर मिळतो. परंतु ग्रामीण भागात डेअरीवर मात्र देशी गाय पशुपालकांना गायीच्या दुधाला २५ ते ३० रुपयांपेक्षा अधिकचा दर मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांचा ओढा कमी होत असल्याचे राज्यात चित्र आहे.
दुभत्या गायींना नेहमीच्या आवश्यक चाऱ्यासोबत विविध जीवनसत्वे आणि प्रथिनांचा समावेश असलेले पशुखाद्य नियमीत द्यावे लागते. बाजारात असे पशुखाद्य महागडे असल्याने अनेक पशुपालकांना ते परवडत नाही. त्यामुळे गाय पालनाकडे ओढा कमी असल्याचे दिसून येते.
राज्यात शेतीची दुरावस्था पाहता, शेतकऱ्यांची पुढची नवीन पिढी शेती व्यवसायात थांबत नसल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागाताली तरुण पिढी नोकरी-रोजगार मिळविण्यासाठी शहरी भागाकडे स्थलांतर करताना दिसते. त्यामुळे ग्रामीण भागात देशी गायींचे पशुपालनात घट झाल्याचे मानले जाते.
गेल्या काही वर्षांत शेतीच्या कामांसाठी विविध, आधुनिक अवजारांचा वापर करण्यात येत आहे. सारा, टोकण, तणकाढणी, फवारणी, मळी, कापणीची कामे यंत्राद्वारे सहज होत असून ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, कल्टीव्हेटर, हार्वेस्टरमुळे शेतीसाठी लागणाऱ्या कामगारांची गरज कमी झाली आहे. अशा परिस्थितीत शेतीच्या कामासाठी बैलांचा फार उपयोग केला जात नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये देशी गायी पाळण्याचा कल कमी झाल्याचे दिसून आले आहे.