…म्हणून एकनाथ शिंदे गृहमंत्रीपदासाठी अडून बसले; खासदार संजय राऊतांनी सांगितलं कारण!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  …म्हणून एकनाथ शिंदे गृहमंत्रीपदासाठी अडून बसले; खासदार संजय राऊतांनी सांगितलं कारण!

…म्हणून एकनाथ शिंदे गृहमंत्रीपदासाठी अडून बसले; खासदार संजय राऊतांनी सांगितलं कारण!

Dec 02, 2024 04:43 PM IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला सुस्पष्ट बहुमत मिळून १० दिवस उलटले आहे. तरीदेखील महायुतीचा मुख्यमंत्री निश्चित झालेला नाही. त्यात एकनाथ शिंदे गृहमंत्रीपदासाठी अडून बसल्याची जोरदार चर्चा आहे.

एकनाथ शिंदे यांना गृहमंत्रीपद का हवं?
एकनाथ शिंदे यांना गृहमंत्रीपद का हवं?

महायुतीला विधानसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळाल्यानंतरदेखील गेले १० दिवस राज्यात सरकार स्थापन झालेलं नाही. सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा अद्याप ठरलेला नाही. त्यात राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गृहमंत्रीपदासाठी अडून बसल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. सरकार स्थापनेसाठी संथगतीने सुरू असलेल्या या प्रक्रियेवर विरोधकांनी फिरकी घेत टीका केली आहे. एकनाथ शिंदे यांना गृहमंत्रीपद का हवं आहे, या मागचे कारण शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितलं. 

राऊत म्हणाले, ‘राज्याच्या कॅबिनेटमध्ये गृहखातं हे दुसऱ्या क्रमांकाचं खातं असतं. मुख्यमंत्री हे खातं आपल्याकडे ठेवतात. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी हे खातं स्वतःकडे ठेवलं होतं. एकनाथ शिंदे यांना पोलीसांकडून सलाम हवा आहे… पोलीस यंत्रणा वापरून त्यांना अनेकांवर खोटे गुन्हे दाखल केले आहे. दहशत निर्माण केली आहे. निवडणुका लढण्याचा प्रयत्न केला आहे. गृहमंत्री होऊन त्यांना ही यंत्रणा हातात हवी आहे. भविष्यात याच यंत्रणेचा वापर करून ते भाजपच्या अंगावर जाऊ शकतात. ही त्यांची वृत्ती आणि विकृती आहे.’ असं राऊत म्हणाले. 

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुसऱ्या पक्षाला गृहखातं देण्याची चूक करू नये, असं खुद्द देवेंद्र फडणवीस बोलले होते, असं राऊत म्हणाले. आमचंही तेच म्हणण होतं. गृह खातं , विधानसभेचं अध्यक्षपद हे संवेदनशील विषय होते. त्याच्यामुळेच आमचं सरकार पडलं, असंही राऊत म्हणाले. 

मोहन भागवत यांनी नरेंद्र मोदींना सल्ला द्यावा

देशात प्रत्येकाने दोन किंवा तीन अपत्ये जन्माला घालावी, या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानाचाही राऊत यांनी चांगला समाचार घेतला. राऊत म्हणाले, 'भागवतांना देशाच्या लोकसंख्येबाबत फार चिंता वाटतेय. आज देशाची लोकसंख्या १५० कोटी आहे. सरसंघचालकांना आता आणखी किती लोकसंख्या वाढवण्याची इच्छा आहे? त्यांनी हा सल्ला सर्वप्रथम भाजपला द्यावा. एकेठिकाणी तुमचा पक्ष समान नागरी कायदा आणू इच्छितो, दुसरीकडे आरएसएस म्हणते की तीन मुलं जन्माला घाला… हे संघाचे दुटप्पी धोरण आहे. सध्या देश धोक्यात नसून तुम्ही लोक धोक्यात आहात, असंही राऊत म्हणाले. 

लोकसंख्या वाढल्यास तुमच्याकडे रोजगार आहे का?

राऊत म्हणाले, 'दीडशे कोटी लोकसंख्या असताना तुम्ही म्हणता लोकसंख्या वाढवा. लोकांना देण्यासाठी तुमच्याकडे रोजगार आहेत का? लोकांच्या डोक्यावर छप्पर आहे का? तुम्ही शेतकऱ्यांच्या मालाला भाव देताय का? शिक्षण मोफत आहे का? महिलांची सुरक्षा होत आहे का, त्याबद्दल सरसंघचालक का बोलत नाही असं राऊत म्हणाले. सरसंघचालक भागवत ही वयोवृद्ध व्यक्ती आहे, आपले मत ठेवत असतात. परंतु बांगलादेश, म्यानमार, नेपाळमध्ये हिंदू धोक्ताय आहेत, हे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगायला हवं, असं राऊत म्हणाले. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर