मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  NCP vs BJP: 'मराठी दांडिया' भरवणारा भाजप मांसाहाराला होणाऱ्या विरोधावर का बोलत नाही?'

NCP vs BJP: 'मराठी दांडिया' भरवणारा भाजप मांसाहाराला होणाऱ्या विरोधावर का बोलत नाही?'

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Sep 28, 2022 12:27 PM IST

NCP questions BJP over Non Veg Issue: मराठी मुंबईकरांच्या मतासाठी दांडिया आयोजित करणारा भाजप मांसाहाराला होणाऱ्या विरोधावर का बोलत नाही, असा रोकडा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे.

NCP Vs BJP
NCP Vs BJP

NCP questions BJP over Marathi Dandiya: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय कुरघोडी वाढल्या आहेत. शिवसेनेच्या ताब्यातून मुंबई महापालिका खेचून घेण्यासाठी भाजप हरतऱ्हेचे प्रयत्न करत आहे. सध्या उत्सवाच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. दहीहंडी, गणेशोत्सवानंतर आता भाजपनं नवरात्र उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना ताकद दिली आहे. त्यावरून शिवसेनेनं टीका केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपची कोंडी करणारा सवाल केला आहे.

मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मराठी मतं मिळवण्यासाठी भाजप मुंबईत 'मराठी दांडिया'चं आयोजन करत आहे आणि दुसरीकडं तोच भाजप 'मांस उत्पादनांच्या जाहिरातींवर' बंदी घालण्याच्या आवाहनावर गप्प आहे. त्या मुद्द्यावर भाजप का बोलत नाही,' असा रोकडा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी केला आहे.

क्रास्टो यांनी या संदर्भात एक ट्वीट केलं आहे. ‘नवरात्रोत्सव काळात मराठी माणसांच्या मांसाहार करण्यावर व मांसाहारी जाहिरातीवर बंदी घालावी अशी मागणी करण्यात येत आहे. त्या बंदीबाबत भाजप चकार शब्द काढायला तयार नाही आणि दुसरीकडं मराठी दांडियाचं आयोजन करत आहे, याकडं क्रास्टो यांनी लक्ष वेधलं.

मराठी माणसांच्या मांसाहार करण्यावर आणि मांसाहारी उत्पादनावर बंदीच्या आवाहनाला भाजप पाठिंबा देणार की मराठी माणसांना मांसाहारापासून दूर राहण्यास सांगेल, असा खोचक सवाल क्लाईड क्रास्टो यांनी केला आहे.

मुंबईत शाकाहार-मांसाहार वाद जुनाच आहे. काही विशिष्ट समाजातील लोक मांसाहार करत नाहीत. मात्र, इतरांनीही तो करू नये असा आग्रह धरतात. मुंबईसह मोठ्या शहरांतील अनेक सोसायट्यांमध्ये मांसाहार करणाऱ्यांना घरं दिली जात नाहीत. यापूर्वी यावरून राजकीय वाद झाले होते. अलीकडंच मांसाहाराच्या जाहिरातींवर बंदी घालण्याची मागणी करत एकानं उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयानं त्याला खडे बोल सुनावत त्याची याचिका फेटाळली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपला सवाल केला आहे.

मुंबईत भाजपचा हक्काचा समजला जाणारा मतदार मांसाहार न करणारा आहे. त्यामुळंच भाजपनं याबाबत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली आहे.

WhatsApp channel

विभाग