Sanjay Raut : 'कोश्यारींनी शिवरायांचा अपमान केला तेव्हा भाजपनं शिव गौरव यात्रा का काढली नाही?'
Sanjay Raut on Savarkar Gaurav Yatra : भगतसिंह कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले यांचा अपमान केला तेव्हा भाजपनं गौरव यात्रा का नाही काढली, असा बिनतोड सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
Sanjay Raut on Savarkar Gaurav Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान केल्याचा आरोप करत भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं वीर सावरकर गौरव यात्रा काढण्याची घोषणा केली आहे. या घोषणेवर बोलताना खासदार संजय राऊत यांनी भाजप व शिंदे गटाची कोंडी करणारा प्रश्न उपस्थित केला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी गौतम अदानींच्या कथित घोटाळ्याच्या संदर्भात पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच हल्ला केला होता. त्यावेळी पत्रकारांनी राहुल यांना खासदारकीबद्दल प्रश्न विचारला होता. माफी मागितली असती तर खासदारकी वाचली असती असं त्यांच्या निदर्शनास आणलं गेलं. त्यावर माफी मागायला मी सावरकर नाही, गांधी आहे. गांधी माफी मागत नाहीत, असं राहुल म्हणाले होते. त्यावरून राज्यात सध्या राजकीय कुरघोडी सुरू झाली आहे.
भाजप व शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्यासाठी वीर सावरकर गौरव यात्रा आयोजित केली आहे. त्यांच्या या घोषणेची संजय राऊत यांनी खिल्ली उडवली आहे. भाजपच्या भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला तेव्हा भाजपनं शिवाजी महाराज गौरव यात्रा का काढली नाही? याच कोश्यारींनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला तेव्हा भाजपला यात्रा का काढावीशी वाटली नाही? फुले आणि शिवाजी महाराज हा आमचा स्वाभिमान नव्हता का?,' असा रोकडा सवाल संजय राऊत यांनी केला.
कोर्ट हल्ली काहीही म्हणतं?
कोश्यारी यांनी समाजप्रबोधनाच्या अंगानं शिवाजी महाराज व फुले दाम्पत्यावर वक्तव्य केल्याचं पत्रकारांनी राऊत यांच्या निदर्शनास आणलं. त्यावर, ‘हल्ली कोर्ट काहीही म्हणतं. त्या कोर्टात जाऊ नका. जनता काय म्हणते ते महत्त्वाचं आहे. मग सावरकरांबद्दल कोर्टानं काय सांगितलंय? कोर्टाच्या आदेशानं गौरव यात्रा काढली जातेय का?,’ असा प्रतिप्रश्न राऊत यांनी केला.