Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दीकी यांनी जबाबाबत बाबा सिद्दीकी यांच्या डायरीचा उल्लेख केला आहे. त्यात भाजपचे मोहित कंबोज यांचे नाव असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. हत्या झाली त्या दिवशी त्यांचे मोहित कंबोज यांच्याशी चॅटींग झाल्याचे देखील त्यांनी सांगितले. त्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
झिशान सिद्दीकी यांनी गंभीर आरोप केले आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी तपास करुन न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात पोलिसांना दिलेल्या माहितीचा उल्लेख नसून त्या दृष्टीने तपास केला गेला नाही असा आरोप बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांनी केल्याची माहिती आहे. झिशान सिद्दीकी यांनी हे वक्तव्य करताना बाबा सिद्दीकी यांच्याकडील एका डायरीचा उल्लेख केला आहे. या डायरीत शेवटचे नाव भाजपचे नेते मोहित कंबोज यांचं नाव असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता या घटनेला वेगळ वळण मिळण्याची शक्यता आहे.
झिशान यांनी केलेल्या दाव्यानुसार बाबा सिद्दीकी हे वांद्रे परिसरातील अनेक झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांच्या कामासाठी पुढे राहायचे. यामुळे त्यांचा काही मोठ्या बिल्डर्ससोबत वाद झाला होता. त्यांना डायरी लिहण्याची सवय होती. या डायरीत त्यांनी या सगळ्या बिल्डर्सची नावे लिहून ठेवली आहेत. त्यांची हत्या झाली त्या दिवशी त्यांनी त्यांच्या डायरीत मोहित कंबोज यांच नाव लिहिलं तसेच त्यांच्या सोबत व्हॉटसॲपवर चॅटिंगही केले होते. मात्र, त्याच दिवशी रात्री त्यांची हत्या करण्यात आली.
सिद्दीकी यांच्या हत्येचा कट का रचला गेला ? याची कबुली हल्लेखोराने दिल्याचे समजते. त्याने पोलिसांना गँगस्टर अनमोल बिश्नोईचे नावही सांगितले आहे. या प्रकरणी पोलिसांनी २५ हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे.
कुख्यात गुन्हेगार अनमोल बिश्नोईयाने दाऊद इब्राहिमशी संबंध आणि १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटात सहभागाबद्दल राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला करण्याचे आदेश दिले होते. सिद्दीकी यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप असलेला मुख्य शूटर शिवकुमार गौतम याने पोलिसांना दिलेल्या कबुलीजबाबात ही माहिती दिली आहे.
महाराष्ट्राचे माजी मंत्री सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात गौतमचा कबुलीजबाब आहे. मुंबईतील वांद्रे पूर्व भागात सिद्दीकी यांचा मुलगा जीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर तीन हल्लेखोरांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली होती.
बाबा सिद्दीकी किंवा जीशान सिद्दीकी यांना ठार मारण्यास सांगितले होते आणि त्या बदल्यात १५ लाख रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, असा दावाही गौतमने केला आहे. पुण्यात भंगार गोळा करून सहआरोपी हरिशकुमार कश्यप याला माल विकायचा, असे त्याने पोलिसांना सांगितले आहे.
भंगाराचे दुकान चालविणाऱ्या कश्यपने त्याच्या राहण्याची व्यवस्था केली होती आणि याच दरम्यान प्रवीण लोणकर व त्याचा भाऊ शुभम लोणकर यांच्याशी त्याची ओळख झाली, असे त्याने पोलिसांना सांगितले. शुभम लोणकर याने एक दिवस शूटरला सांगितले की, तो आणि त्याचा भाऊ बिश्नोई टोळीसाठी काम करतात. जून २०२४ मध्ये शुभम लोणकर (शुब्बू) ने मला आणि धर्मराज कश्यपला (सहशूटर) सांगितले की, जर आम्ही त्याच्या म्हणण्यानुसार काम केले तर आम्हाला १० ते १५ लाख रुपये दिले जाऊ शकतात. मी कामाबद्दल विचारले असता शुभमने बाबा सिद्दीकी किंवा त्याचा मुलगा जीशान सिद्दीकीला मारायचे असल्याचे सांगितले. पण त्यांनी अधिक माहिती दिली नाही.
सिद्दीकी हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोपपत्रात सिद्दीकीची हत्या अनमोलच्या नेतृत्वाखालील क्राईम सिंडिकेटने केल्याचे म्हटले आहे. आरोपीने अनमोलसोबत झालेल्या संभाषणाची माहिती पोलिसांना दिली आहे.
इंडियन एक्सप्रेसने आरोपींनी केलेल्या संभाषणांच वृत्त दिलं आहे. शुभम लोणकर आणि अनमोल यांच्यात स्पीकरवर संभाषण झाल्याचा दावा पोलिसांनी केला असून त्यावेळी अन्य तीन आरोपीही उपस्थित होते. त्याचा साथीदार अनुज थापनच्या मृत्यूचा बदला म्हणून अनमोलने हत्येची योजना आखल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे.
संबंधित बातम्या