मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mauris Noronha : अभिषेक घोसाळकर यांची हत्या करून स्वत:लाही संपवणारा मॉरिस नोरोन्हा होता कोण?

Mauris Noronha : अभिषेक घोसाळकर यांची हत्या करून स्वत:लाही संपवणारा मॉरिस नोरोन्हा होता कोण?

Feb 09, 2024 12:27 PM IST

Who was Morris Noronha : ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या करून स्वत:ला संपवणारा मॉरिस नोरोन्हा कोण होता? जाणून घ्या सर्वकाही

Morris Noronha with Abhishek Ghosalkar
Morris Noronha with Abhishek Ghosalkar

Who was morris noronha : ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येमुळं मुंबईत खळबळ उडाली आहे. घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर त्यांचा मारेकरी मॉरिस नोरोन्हा यानं स्वत:ही आत्महत्या केली. घोसाळकर यांच्या सोबत फेसबुक लाइव्ह करून अत्यंत थंड डोक्यानं मॉरिसनं त्यांची हत्या केली. हा नोरोना नेमका कोण होता? त्याचा घोसाळकरांवर असा काय राग होता?,' याची चर्चा आता सुरू झाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मॉरिस नोरोन्हा यांच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर त्यानं स्वत:चं वर्णनं पुरस्कारप्राप्त सामाजिक कार्यकर्ता, कोविड योद्धा आणि परोपकारी असं केलं आहे. तो बोरिवली परिसरात मॉरिस भाई म्हणून ओळखला जायचा.

मॉरिस हा दहिसर-बोरिवली परिसरात एक स्वयंसेवी संस्था चालवायचा. काही कारणावरून त्याचा अभिषेक घोसाळकर यांच्याशी वाद झाला होता. घोसाळकर यांनी नोरोन्हाच्या विरोधात तक्रारही केली होती.

घोसाळकरांनी गुन्ह्यात अडकवल्याचा राग?

मुंबईतील एमएचबी पोलीस ठाण्यात मॉरिस विरोधात बलात्कार आणि विनयभंग करण्याच्या उद्देशानं महिलांविषयी अश्लील शेरेबाजी केल्याचे दोन गुन्हे दाखल आहेत. एका बलात्काराच्या प्रकरणात त्याला अटक झाली होती. काही महिने तो पुण्यातील येरवडा तुरुंगात बंद होता. या दोन्ही प्रकरणात आपल्याला अडकवण्यासाठी दोन्ही गुन्ह्यात अभिषेक घेसाळकर यांनीच पोलिसांवर दबाव टाकल्याचं मॉरिसला वाटत होतं. त्यातूनच त्यांची घोसाळकर यांच्यावर खुन्नस होती. त्यामुळंच कट करून त्यानं हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.

सर्व पक्षीयांशी संबंध

मॉरिसचे सर्वच पक्षातील लोकांशी संंबंध होते. काही दिवसांपूर्वीच तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटल्याचे फोटोही समोर आले आहेत. मात्र, तो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून राजकारणात प्रवेश करण्याच्या विचारातही होता. नोरोन्हा वॉर्ड क्रमांक १ मधून निवडणूक लढवण्यास इच्छुक होता. याच वॉर्डातून घोसाळकर पूर्वी नगरसेवक होते. त्यातूनही दोघांमध्ये संघर्ष असल्याचं बोललं जातं.

घोसाळकर यांच्या मनाली ट्रिपचीही मॉरिसला माहिती होती!

काही दिवसांपासून त्यानं अभिषेक घोसाळकर यांच्याशी जवळीक वाढवली होती. घोसाळकर यांच्या वाढदिवशी बॅनरही लावले होते. घोसाळकर यांच्या रोजच्या हालचालींवरही तो लक्ष ठेवून होता. घोसाळकर हे आपल्या लग्नाच्या वाढदिवशी १४ फेब्रुवारीला मनालीला जाणार असल्याचंही मॉरिसला माहीत होतं. घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर स्वत:च तो तसं सांगत होता. ‘आय किल्ड अभिषेक, अभी वो मनाली नही जायेगा…’ असं ओरडतच तो बाहेर आला आणि स्वत:वरही गोळी झाडली.

WhatsApp channel