अभिनेता सुनील दत्त यांनी बाबा सिद्दिकींना आणलं होतं राजकारणात; मुंबई मनपाचे नगरसेवक ते मंत्रीपदापर्यंतचा प्रवास
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  अभिनेता सुनील दत्त यांनी बाबा सिद्दिकींना आणलं होतं राजकारणात; मुंबई मनपाचे नगरसेवक ते मंत्रीपदापर्यंतचा प्रवास

अभिनेता सुनील दत्त यांनी बाबा सिद्दिकींना आणलं होतं राजकारणात; मुंबई मनपाचे नगरसेवक ते मंत्रीपदापर्यंतचा प्रवास

Updated Oct 13, 2024 12:23 AM IST

baba siddiqui - वांद्रे पश्चिमचे माजी आमदार बाबा सिद्दिकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.

बाबा सिद्दिकी यांची गोळ्या घालून हत्या
बाबा सिद्दिकी यांची गोळ्या घालून हत्या

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस -अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची आज मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सिद्दिकी यांच्या हत्येनंतर मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. सिद्दिकी यांच्या हत्येनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनेबाबत पत्रकारांना माहिती दिली. सिद्दिकी यांच्या दोन मारेकऱ्यांना अटक करण्यात आली असून एक मारेकरी हा उत्तर प्रदेशचा तर दुसरा हरियाणाचा रहिवासी असल्याची माहिती आहे. बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारात मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी, निषेधार्ह आणि वेदनादायी असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. या घटनेमुळे आपल्याला धक्का बसला असून मी माझा चांगला सहकारी, मित्र गमावला असून या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करतो, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

अभिनेते सुनील दत्त यांनी आणलं होतं बाबा सिद्दिकींना राजकारणात

बाबा सिद्दिकी यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात मुंबईतील वांद्रे भागातून कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून केली होती. विद्यार्थी दशेत ते एनएसयूआयमध्ये सक्रिय होते. १९८८ साली ते मुंबई यूथ कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. त्यानंतर दोन वेळा मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून ते निवडून आले होते. वांद्रे भागात सुनील दत्त यांच्या समाजकार्याने ते प्रभावित होते. १९८७ साली पंजाब अशांत असताना सुनील दत्त यांनी मुंबई ते अमृतसर अशी २००० किमीची ‘महाशांती पदयात्रा’ काढली होती. या पदयात्रेत बाबा सिद्दिकी यांनी सहभाग घेतला होता. बाबा सिद्दिकी हे अभिनेते सुनील दत्त यांना नेहमी आपले राजकीय गुरू मानायचे. दत्त कुटुंबातील अभिनेता संजय दत्त, माजी खासदार प्रिया दत्त यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते.

नगरसेवक ते मंत्रीपदापर्यतचा प्रवास

बाबा सिद्दिकी हे १९९३ आणी १९९८ साली मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर वांद्रे -पश्चिम मतदारसंघातून १९९९, २००४ आणि २००९ असे तीन वेळा कॉंग्रेस पक्षाचे आमदार म्हणून निवडून आले होते. २००४ ते २००८ दरम्यान बाबा सिद्दिकी यांनी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व कामगार खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम केले होते.  २०००-२००४ दरम्यान ते म्हाडाच्या मुंबई बोर्डचे चेअरमन होते. 

४८ वर्षानंतर दिलेली कॉंग्रेसला सोडचिट्ठी

बाबा सिद्दिकी यांनी नुकतेच कॉंग्रेस पक्षाला सोडचिट्ठी देऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) गटात सामिल झाले होते. बाबा सिद्दिकी यांचे पुत्र झिशान सिद्दिकी हे वांद्रे (पूर्व) येथून कॉंग्रेसचे आमदार आहेत. कॉंग्रेस पक्षाने नुकताच झिशान सिद्दिकी यांच्यावर पक्षविरोधी कारवाया करत असल्याचा ठपका ठेवत कॉंग्रेसमधून हकालपट्टी केली होती. आगामी विधानसभा निवडणुकीत झिशान सिद्दिकी हे अजित पवार गटाकडून लढणार असल्याचे बोलले जात आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर