Abhishek Ghosalkar Political Career: शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गुरुवारी (०८ फेब्रुवारी २०२४) गोळीबार करण्यात आला. गोळीबारानंतर त्यांना तत्काळ करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण दहिसर हादरले.
अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिस नोरोन्हा नावाच्या व्यक्तीने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्याही केली. मिळालेल्या माहितीनुसार, मॉरिस स्वंयघोषित नेता होता. अभिषेक घोसाळकर यांना एका कार्यक्रमाकरता मॉरिस नावाच्या व्यक्तीने त्यांच्या कार्यालयात बोलावले. तिथं घोसाळकर यांच्यासोबत फेसबुक लाइव्ह केले. फेसबुक लाईव्हवरील संवाद संपल्यानंतर मॉरिस उठून निघून गेला. यानंतर अभिषेक घोसाळकर फेसबूक लाईव्हद्वारे बोलत होते. हा संवाद संपताच अभिषेक घोसाळकरही जागेवरून उठले. मात्र, ते उठताच मॉरिसने त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या अभिषेक घोसाळकर यांना तातडीने जवळच्याच करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
अभिषेक घोसाळकर हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे ते सुपुत्र होते. विनोद घोसाळकर हे २००९ ते २०१४ पर्यंत आमदार होते. अभिषेक घोसाळकर हे मुंबई महापालिकेत नगरसेवक होते. तसंच, मुंबै बँकेचे ते संचालक देखील होते. अभिषेक हे आदित्य ठाकरे यांच्या विश्वासूंपैकी शिलेदारांपैकी एक होते. नागरिकांच्या प्रश्नांसाठी भांडणारा नगरसेवक म्हणून त्यांची ओळख होती. मदतीसाठी आलेला माणूस आपला मतदार आहे की नाही हे न पाहता अभिषेक घोसाळकर हे त्याला मदत करत असत, असं शिवसैनिक सांगतात.
यापूर्वी पु्ण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळ यांची त्यांच्याच साथीदाराने ढिवसाढवळ्या भररस्त्यात हत्या केली. त्यानंतर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस स्थानकात शिंदे गटातील कार्यकर्ते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या दोन्ही घटना ताज्या असताना अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली.