Saif Ali Khan attacker arrested : सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यातील मुख्य आरोपी विजय दास याला मुंबई पोलिसांनी रविवारी पहाटे ठाणे पश्चिम भागातून अटक केली. झोन सहाचे डीसीपी नवनाथ ढवळे आणि कासारवडवली पोलिसांच्या पथकाने संयुक्तपणे आरोपीला अटक केली. आरोपी हा मजुरांच्या छावणीत लपून बसला होता. पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून त्याला अटक केली आहे. हिरानंदानी इस्टेटच्या टीसीएस कॉल सेंटरजवळ मेट्रोच्या बांधकामाच्या जागेच्या मागे मजुरांचे कॅम्प होते.
अभिनेता सैफ अली खान याच्या वांद्रे येथील राहत्या घरी चोरीच्या उद्देशाने आरोपीने घरात घुसून त्याच्यावर सहा वार केल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. या घटनेमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. या घटनेनंतर हल्लेखोर पसार झाला. सैफला त्याचा मुलगा इब्राहिम अली खानने मुंबईतील लीलावती रुग्णालयात रिक्षातून दाखल केले, जिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. सैफ अली खान आता धोक्याबाहेर असून त्याची प्रकृती स्थिर आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुख्य आरोपी विजय दास हा पूर्वी मुंबईतील एका पबमध्ये कामाला होता. तो मूळचा पश्चिम बंगालचा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची अनेक नावे आहेत. त्याला विजय दास, बिजॉय दास आणि मोहम्मद इलियास या तीन नावांनी ओळखलं जातं. विजय दासला आज रविवारी न्यायालयात हजर केले जाणार असून त्याच्या कोठडीची मागणी केली जाणार आहे.
सैफ अली खानच्या घरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी दिसत होता, ज्यात तो पायऱ्या चढून सैफच्या अपार्टमेंटच्या १२ व्या मजल्यावर जाताना दिसत होता. झोन-९ चे डीसीपी दीक्षित गेडाम यांनी सांगितले की, आरोपीने सैफच्या घरात प्रवेश करण्यासाठी पायऱ्यांचा वापर केला होता.
घटनेच्या वेळी सैफ अली खानच्या घरात काम करणारी एलिअम्मा फिलिप्स (लिमा) ही होती. तिने सर्वात आधी आरोपीला पाहिले. लिमाने आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला. आरोपीने तिला देखील मारहाण केली. यात ती जखमी झाली. लीमाचा आरडाओरडा ऐकून सैफ अली खान आपल्या खोलीतून बाहेर आला. यावेळी आरोपीने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. त्याने सहा वार सैफवर केले. यात सैफ हा गंभीर जखमी झाला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.
मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबात लिमाने म्हटले आहे की, आरोपी हा सडपातळ बांध्यांचा होता. तर रंगाने तो सावळा होता. त्याचे वय सुमारे तीस वर्षे व उंची सुमारे ५ फूट ५ इंच होती. घटनेच्या सहा तासांनंतर आरोपी दादरमधील एका दुकानात हेडफोन खरेदी करताना दिसला. त्याने निळ्या रंगाचा शर्ट घातला होता. याआधी तो वांद्रे रेल्वे स्थानकावरही दिसला होता, जिथे तो ट्रेनमध्ये बसला.
मुंबई पोलीस आज सकाळी ९ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत मुंबई पोलिस अनेक खुलासे करू करण्याची शक्यता आहे. रात्री २ वाजण्याच्या सुमारास आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीला पकडण्यासाठी सुमारे १०० अधिकाऱ्यांची एक टीम तयार करण्यात आली होती. या टीमने मध्यरात्री दोन वाजता कासारवडवली येथील दाट झाडीतील लेबर कॅम्प मधून आरोपीला अटक केली आहे. डीसीपी झोन-६ नवनाथ ढवळे यांच्या पथकाने आणि कासारवडवली पोलिसांनी संयुक्त कारवाईत आरोपीला अटक केली.
सैफ अली खानला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या डाव्या हाताला आणि मानेला दोन खोल जखमा झाल्या होत्या. सैफच्या मणक्यात चाकूचे तुकडे सापडले असून ते काढून टाकण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अनेक शस्त्रक्रियेनंतर त्याची प्रकृती आता स्थिर आहे. लीलावती हॉस्पिटलचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर डॉ. नीरज उत्तमणी यांनी शुक्रवारी सांगितले की, सैफ अली खानला विशेष कक्षात हलविण्यात आले असून तो पूर्णपणे बरा होत आहे.
संबंधित बातम्या