Sureshdhas on Ncp Munni : बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण राज्यभरात तापलं असून विरोधकांनी यावरून सरकारला घेरलं आहे. सर्वपक्षीय आमदारांसोबतच भाजपाचे आमदार सुरेश धस यावरून कमालीचे आक्रमक झाले असून त्यांनी धनंजय मुंडे व या प्रकरणातील वाल्मीक कराड यांच्याविरोधातकमालीची आक्रमक भूमिका घेतली आहेत. त्याचबरोबर त्यांनी अजित पवार यांच्या गटात एक बडी मुन्नी असून ती माझ्याविरोधात मिटकरी व सूरज चव्हाण या तरुणांना बोलायला लावते, असा दावा करत खळबळ उडवून दिली आहे. धस यांनी उल्लेख केल्यापासून अजित पवार गटातील ती बडी मुन्नी कोण, याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. आता स्वत: सुरेश धस यांनीच राष्ट्रवादीतील बडी मुन्नीबाबत मोठा उलगडा केला आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना सुरेश धस यांनी मुन्नी कोण? या प्रश्नाचा उलगडा केला. सुरेश धस म्हणाले, जी मुन्नी आहे तिला कळालेलं आहे. ती एकच आहे. सर्वात म्हणजे ती महिला नाही. नाहीतर आणखी काहीतर राळ उठायची. मी मुन्नी म्हटले असले तरी राष्ट्रवादीतील पुरुष मुन्नी आहे. त्या पुरुष मुन्नीला पक्के माहिती आहे की, सुरेश धस माझ्याबद्दलच बोलत आहे. मुन्नीला माझी विनंती होती की, कच्चे बच्चे लोक बोलायला पाठवू नका. पाठवायचे असेल तर दुसऱ्यांना पाठवावे किंवा स्वत: मुन्नीने यावे. मुन्नी आल्याशिवाय मजा येणार आहे.
सुरेश धस म्हणाले, मुन्नीसोबत माझे फोटोही आहेत. मी मुन्नी बोलायची वाट बघतोय मात्र मुन्नी बोलायला तयारच नाही. मुन्नी मला घाबरते, ती बोलल्यावर मुन्नीचे कपडे टराटरा फाडील. राष्ट्रवादीतून आम्हाला बाहेर काढायला मुन्नीचा मोठा हात आहे म्हणून मी त्याला मुन्नी म्हणतो.
आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादीतील मुन्नीचा उल्लेख केल्यानंतर मुन्नीवरून राजकीय वर्तुळात बरीच चर्चा रंगली होती. याबाबत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार यांनाही विचारण्यात आले होते. मात्र या प्रश्नावर अजित पवार संतापले होते. कोण मुन्नी ते तुम्ही सुरेश धसांनाच विचारा. अशा फालतू गोष्टी कोणी बोलत असेल तर मी स्पष्ट नाव घेऊन बोलणार आहे. त्यामुळे त्यालाच विचारा कोण मुन्नी आहे.