मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  नवनीत राणा बारमध्ये काम करायच्या, कशाला एवढं महत्त्व द्यायचं?: विद्या चव्हाण

नवनीत राणा बारमध्ये काम करायच्या, कशाला एवढं महत्त्व द्यायचं?: विद्या चव्हाण

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
May 14, 2022 12:50 PM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्रावरील संकट म्हणत त्यांचं सरकार घालवण्यासाठी हनुमान चालिसा पठण करणाऱ्या राणा दाम्पत्यावर आमदार विद्या चव्हाण यांनी टीकेची झोड उठवली आहे.

विद्या चव्हाण-रवी राणा-नवनीत राणा
विद्या चव्हाण-रवी राणा-नवनीत राणा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर रोजच्या रोज आक्षेपार्ह शब्दांत टीका करणाऱ्या व राज्यातील सरकार घालवण्यासाठी दिल्लीत आरती आणि हनुमान चालिसाचं (Hanuman Chalisa Row) पठण करणाऱ्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) व आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष, आमदार विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांनी सडकून टीका केली आहे. 

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार (Maha Vikas Aghadi Government) आल्यापासून राणा दाम्पत्य सातत्यानं या सरकारवर व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहे. अलीकडंच त्यांनी अचानक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा म्हणण्याचा हट्ट धरला होता. त्यांना शिवसैनिकांनी विरोध केल्यामुळं मुंबईतील वातावरण तणावपूर्ण बनलं होतं. या प्रकरणी त्यांना अटकही करण्यात आली होती. तब्बल १२ दिवस कोठडीत राहिल्यानंतर बाहेर आलेलं राणा दाम्पत्य पुन्हा मुख्यमंत्र्यांवर आगपाखड करत आहे. 'उद्धव ठाकरे सरकार हे महाराष्ट्रावरील सर्वात मोठं संकट आहे, ते दूर व्हावं व मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी यावी, असं सांगत आज नवनीत राणा व रवी राणा यांनी दिल्लीत हनुमान चालिसा पठण केलं. 

एका वृत्तवाहिनीशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्या चव्हाण यांनी राणा दाम्पत्याच्या या आंदोलनाचा शेलक्या शब्दांत समाचार घेतला. ‘या नवनीत राणा आहेत कोण? त्या यापूर्वी बारमध्ये काम करत होत्या. त्यानंतर सी ग्रेड चित्रपटांमध्ये काम केलं. खोटं जातप्रमाणपत्र सादर करून त्या खासदार झाल्या आहेत. त्यांना इतकं महत्त्व देण्याची गरज नाही. मीडियात चर्चेत राहण्यासाठी हे पती-पत्नी उठसूट मुख्यमंत्र्यांविरोधात बोलतात. मुख्यमंत्रिपद हे मानाचं पद आहे. त्या पदाचा आदर केला गेला पाहिजे,' असं विद्या चव्हाण म्हणाल्या.

रवी राणा यांच्यावरही विद्या चव्हाण यांनी निशाणा साधला. रवी राणा यांनी अमरावतीमध्ये निवडणुकीच्या काळात प्रेशर कुकर वाटले होते. पण त्याचं झाकण दिलं नव्हतं. त्याबद्दल महिला मतदार त्यांच्याकडं विचारणा करण्यास गेल्या तेव्हा त्यांनी मला मत द्या, मग झाकण देतो, असं सांगितलं होतं. यावरून यांची पात्रता कळते, असा टोला विद्या चव्हाण यांनी हाणला. 

 

WhatsApp channel