Eknath Shinde News: राज्यात नवे सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्नांना वेग आला असला तरी मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळाले. मात्र, महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असणार? याबाबत काल दिल्लीत निर्णय झाला. मुख्यमंत्रीपद भाजपकडेच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आल्याने राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचा चर्चा सुरू झाल्या. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्रीपदाच्या बदल्यात भाजपने एकनाथ शिंदे यांच्यासमोर दोन पर्याय ठेवले असल्याची माहिती समोर आली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. या राजीनाम्यामुळे महाराष्ट्र विधानसभा बरखास्त झाली असून आता नवे सरकार स्थापन होईपर्यंत एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार पाहतील. भाजपने मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे सांगण्यात येत आहे. आज सायंकाळपर्यंत मुख्यमंत्रिपदाच्या नावाची घोषणा होऊ शकते, अशीही माहिती समोर येत आहे. त्याआधी भाजपने एकनाथ शिंदे यांच्यासमोर केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान किंवा राज्यात उपमुख्यमंत्री पद असे दोन पर्याय ठेवल्याचे सांगितले जात आहे. याबाबत लवकरत अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
'महायुतीच्या प्रचंड विजयानंतर राज्यात पुन्हा एकदा आपले सरकार स्थापन होणार आहे. महायुती म्हणून आपण एकत्रित निवडणूक लढवली आणि आजही एकत्रच आहोत. माझ्यावरील प्रेमापोटी काही मंडळींनी सर्वांना एकत्र जमण्याचे, मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे. तुमच्या या प्रेमासाठी मी अत्यंत मनापासून ऋणी आहे. मात्र, अशा पद्धतीने माझ्या समर्थनार्थ कुणीही एकत्र येऊ नये, असे आवाहन मी करतो. पुन्हा एकदा माझी नम्र विनंती की, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थान किंवा अन्य कुठेही एकत्र जमू नये. समर्थ आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी महायुती भक्कम होती, आहे आणि यापुढेही भक्कमच राहील', असे ट्वीट एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री केले.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीत निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले. महायुतीला एकूण २३३ जागांवर विजय मिळवता आला आहे. तर, महाविकास आघाडीने फक्त ५० जागा जिंकल्या. केंद्रीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भाजपला १३२ जागेवर विजय मिळवता आहे. तर, त्यांचा मित्रपक्ष असलेल्या शिंदे आणि अजित पवार गटाला अनुक्रमे ५७ आणि ४१ जागेवर विजय मिळवता आला. दुसरीकडे, महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेला १६ जागा मिळाल्या. तर, ठाकरे गट आणि शरद पवार गटाला अनुक्रमे २० आणि १० जागा जिंकत्या आल्या.