Kambal wale baba : राज्याच्या राजकारणात सध्या ‘कंबल वाले बाबा’ची जोरदार चर्चा आहे. हा 'कंबल वाला बाबा' सध्या मुंबईत असून घाटकोपर इथं त्याचं शिबीर सुरू आहे. भाजपचे आमदार राम कदम यांनी स्वत: हे बाबा चमत्कारी असल्याचा दावा केल्यानंतर राजकारण तापलं आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसनं या बाबासह राम कदम यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
'कंबल वाला बाबा' हा मूळचा राजस्थानचा असून त्याचं नाव गणेशभाई गुर्जर असं आहे. त्याच्या खांद्यावर नेहमी एक चादर (अर्थात कंबल) असते. त्याच्या डोक्यावर काळी पगडी असते. जगातील कोणत्याही गंभीर आजारावर माझ्याकडं उपचार आहे असा त्याचा दावा आहे. त्याच्याकडं मदतीसाठी येणाऱ्या आजारी मनुष्याच्या अंगावर स्वत:च्या खांद्यावरील चादर टाकून तो त्या माणसाला व्याधीमुक्त करतो असं बोललं जातं. वेगवेगळ्या ठिकाणी १५ दिवसांची शिबिरं लावून तो आपला चमत्कार दाखवतो. शिबिरात येण्यासाठी लोक कितीही खर्च करायला तयार असतात. या बाबाकडं अनेक राज्यांतून लोक येतात. कम्बल वाला बाबानं स्पर्श करताच अनेक व्याधी बऱ्या होतात, असं काहीचं म्हणणं आहे, तर काहींनी नेमका उलट अनुभव सांगितला आहे.
भाजपचे आमदार राम कदम यांनी घाटकोपर इथं ‘कंबल वाले बाबा’चं दोन दिवसांचं शिबीर आयोजित केलं आहे. या शिबिराला अनेक लोकांनी गर्दी केली आहे. मात्र, या एकूण प्रकारावरच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसनं तीव्र आक्षेप घेतला आहे.
राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राम कदम यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राम कदम हे अंधश्रद्धा पसरवत असून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
'कंबल वाले बाबा'च्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट लिहून सरकारला घेरलं आहे. 'दिव्यांग व्यक्तींच्या अंगावर कंबल टाकून त्यांना बरं करण्याचा दावा करणारा एक बाबा भाजपच्या आमदाराच्या उपस्थितीत महिलांना संतापजनक पद्धतीनं स्पर्श करतो. महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात असूनही त्याच्यावर कारवाई होत नाही ही खेदाची बाब आहे, असं सुळे यांनी म्हटलं आहे.
'काहीही झालं तरी 'आपलं बोलून मोकळं व्हायचं' असं म्हणणारं हे सरकार, महिलांचा असा राजरोसपणे विनयभंग होत असताना खंबीर पावलं का उचलत नाही? ज्याच्या पाठिंब्यानं अंधश्रद्धा पसरविण्याचे काम केलं जात आहे, त्या आमदारावर कारवाई करण्याची तसदी सरकार घेणार आहे का?, असा प्रश्न करतानाच, 'अशा भोंदू बाबा आणि अंधश्रद्धेला पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात थारा देता कामा नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.
संबंधित बातम्या