अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. राज्यात सर्वात जास्त सहकारी संस्थांचं जाळं या जिल्ह्यात आहे. या जिल्ह्यात लोकसभेच्या शिर्डी आणि अहमदनगर अशा दोन जागा आणि विधानसभेच्या १२ जागा आहेत. नगर जिल्ह्याचं राजकारण अनेक गटा-तटात विभागलेलं असून जिल्ह्याच्या राजकारणावर प्रामुख्याने विखे-पाटील कुटुंबाची गेली अनेक दशकं घट्ट पकड आहे. मात्र वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघावर अनेक राजकीय घराण्यांचं वर्चस्व असल्याचं दिसून येतं. यात संगमनेर तालुक्यात थोरात, कोपरगाव तालुक्यात काळे, नेवासे तालुक्यात गडाख, राहुरी तालुक्यात तनपुरे तर श्रीगोंदा तालुक्यात पाचपुते कुटुंबीयांनी वर्चस्व राखलेलं आहे. अहमदनगर जिल्हा हा बारामतीला लागूनच असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांचाही या जिल्ह्याच्या राजकारणात वेळोवेळी हस्तक्षेप राहिलेला आहे. अहमदनगर जिल्ह्यात १९ साखर कारखाने असून या जिल्ह्यात महाराष्ट्रातील सर्वाधिक दूधाचं उत्पादन होतं. प्रामुख्याने दूध सहकारी संघ, सहकारी साखर कारखाने आणि शिक्षण संस्थांच्या अफाट जाळ्याच्या माध्यमातून येथील राजकारण चालत असतं.
लोकसभा निवडणुकीत जागावाटपात अहमदनगर लोकसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे गेला. या मतदारसंघात शरद पवार यांनी डॉ. सुजय विखे-पाटील या भाजपच्या मातब्बर तत्कालीन विद्यमान खासदाराविरोधात अगदी सर्वसामान्य घरातून आलेले, ग्रामपंचायत, पंचायत समितीच्या राजकारणातून वर आलेल्या एका शिक्षकाचा मुलगा असलेले पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांना लोकसभेचं तिकीट दिलं. अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत अनपेक्षितपणे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नीलेश लंके यांनी भाजपचे डॉ. सुजय विखे-पाटील यांचा २९ हजार मतांनी पराभव करत इतिहास रचला. डॉ. सुजय विखे यांचा लोकसभेतील पराभव हा विखे-पाटील गटाच्या राजकारणाला शरद पवार यांनी दिलेला मोठा धक्का मानला जातोय. लोकसभेच्या पराभवानंतर डॉ. सुजय विखे पाटील यांनी विधानसभेत नशीब आजमावण्याचे जाहीर केले. त्यासाठी त्यांनी कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, संगमनेरचे विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघामध्ये सध्या सभांचा धडाका लावला आहे. एकेकाळी बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राज्यपातळीवर कॉंग्रेस पक्षात वरिष्ठ पदांवर एकत्रित मिळून काम केलेले आहे. परंतु अहमदनगर जिल्ह्याच्या अंतर्गत राजकारणात मात्र या दोघांत तीव्र संघर्ष नेहमी होत राहिलेला आहे. त्यात सुजय विखे-पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढण्याच्या घोषणेनंतर दोघा घराण्यामधला हा संघर्ष आता अधिकच उफाळून आल्याचे दिसून येत आहे.
बाळासाहेब थोरात हे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, स्वातंत्र्य सैनिक दिवंगत भाऊसाहेब थोरात यांचे चिरंजीव असून ते संगमनेर विधानसभा मतदारसंघातून १९८५ पासून सलग आठ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. थोरात हे कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष राहिलेले असून राज्य मंत्रिमंडळात त्यांनी अनेक महत्वाच्या मंत्रिपदांवर काम केले आहे. थोरात यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. मोठी मुलगी शरयू देशमुख या संगमनेरमधील थोरात यांच्या ‘अमृतवाहिनी’ ही शिक्षण संस्था आणि साखर कारखान्यांशी संबंधित काम पाहतात. थोरात हे राज्यपातळीवर पक्षसंघटनेत सक्रिय असल्याने त्यांच्या अनुपस्थितीत त्यांची धाकटी मुलगी डॉ. जयश्री थोरात या संगमनेरमध्ये पक्षाची धुरा सांभाळत आहेत. जयश्री या पेशाने डॉक्टर असून मुंबईच्या टाटा मेमोरियल रुग्णालयात त्या काम करतात. त्यांचे पती डॉ. हसमुख जैन हेही कँसर तज्ञ आहेत. याशिवाय डॉ. जयश्री या संगमनेर तालुका युवक कॉंग्रेसच्या अध्यक्ष असून एकविरा फौंडेशन, संगमनेरच्याही अध्यक्षा आहेत. ज्येष्ठ कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या राजकीय वारसदार म्हणून तालुक्यात त्यांच्याकडे पाहिले जाते. संगमनेरमध्ये अनेक सहकारी संस्था, विविध कार्यकारी सोसायट्या, महिला बचत गट, ग्रामपंचायतींच्या कार्यक्रमांमध्ये सामील होत जयश्री यांनी तालुक्याच्या जनतेशी आपला जनसंपर्क मजबूत केला आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतही त्या सामील झाल्या होत्या.
दरम्यान, संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या प्रचार-जनसंपर्काची धुरा डॉ. जयश्री थोरात या सांभाळत असताना भाजपचे सुजय विखे-पाटील यांना या मतदारसंघातून एन्ट्री केली आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी संगमनेर तालुक्यात एका गावात सुजय विखे पाटील यांच्या एका जाहीर कार्यक्रमात अहमदनगर जिल्ह्यातील भाजप नेते वसंतराव देशमुख हे आपल्या भाषणातून बाळासाहेब थोरात यांच्यावर टिका करत असताना त्यांची मुलगी डॉ. जयश्री थोरात यांच्यावर घसरले. देशमुख यांनी या कार्यक्रमात डॉ. जयश्री यांच्यावर जाहीरपणे गलिच्छ भाषेत टिका केल्याने एकीकडे राजकारणाच्या घसरलेल्या पातळीवर चिंता व्यक्त होताना आता जिल्ह्याचं राजकारणात याचे कसे पडसाद उमटतात, ते भविष्यात स्पष्ट होईल.
संबंधित बातम्या