Saif Ali Khan : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर मुंबईतील त्याच्या राहत्या घरी गुरुवारी पहाटे चाकू हल्ला झाल्यामुळं बॉलिवूडसह त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. सैफवरील हल्ल्यानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले असून काही अधिकाऱ्यांनी आज सैफच्या घरी भेट दिली. त्यात एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून गाजलेले दया नायक हेही होते.
हल्ल्यानंतर सैफला मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याची प्रकृती स्थिर आहे. सैफचं घर असलेलं वांद्र्यातील ‘सद्गुरु शरण’ हे अपार्टमेंट सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे. दया नायक यांनी या घरी भेट दिल्यानं चर्चेत भर पडली आहे.
दया नायक हे १९९० च्या दशकात मुंबईतील ८० पेक्षा जास्त अंडरवर्ल्ड गुंडांना गोळ्या घालून ठार करण्यासाठी ओळखले जातात. कर्नाटकातील उडुपी इथं एका कोकणी भाषिक कुटुंबात त्यांचा जन्म झाला. कन्नड माध्यमाच्या शाळेतून इयत्ता सातवीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर नायक १९७९ मध्ये नोकरीच्या शोधात मुंबईला आले.
भारताच्या आर्थिक राजधानीत त्यांनी पहिली नोकरी एका हॉटेलमध्ये केली. त्या हॉटेलमध्येच मुंबईतील गोरेगाव येथील महापालिकेच्या शाळेतून त्यांनी बारावीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर अंधेरीच्या सीईएस कॉलेजमधून त्यांनी पदवीचं शिक्षण पूर्ण केलं.
प्लंबर अप्रेंटिस म्हणून नोकरी करत असताना अंमली पदार्थ विभागातील काही पोलीस अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर पोलीस अधिकारी होण्याचं त्यांच्या मनानं घेतलं. अखेर १९९५ मध्ये पोलीस अकादमीतून पदवी घेतल्यानंतर जुहू पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. याच काळात मुंबईत अंडरवर्ल्डचा बोलबाला होता.
डिसेंबर १९९६ मध्ये त्यांनी मुंबईतील जुहू इथं छोटा राजनच्या दोन गुंडांवर गोळीबार करून त्याची हत्या केली. त्यामुळं पोलीस वर्तुळात नायक यांची लोकप्रियता वाढली आणि पुढं ते एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जाऊ लागले.
प्रसिद्धीबरोबर नायक हे वादग्रस्तही ठरू लागले. उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमवल्याच्या आरोपावरून त्यांची चौकशी सुरू झाली. २००४ मध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याच्या (मोक्का) न्यायालयानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (ACB) नायक यांच्या बेहिशेबी संपत्तीची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. एसीबीनं नायक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून बेंगळुरूतील दोन ठिकाणांसह सहा ठिकाणी छापे टाकले. या छाप्यांमध्ये नायक यांच्याकडं दोन लक्झरी बस असल्याचं उघड झालं. त्यापैकी एक मुंबईच्या अंधेरीतील विशाल ट्रॅव्हल्स नावाच्या ट्रॅव्हल एजन्सीकडं होती तर, दुसरी कर्नाटकातील करकला शहरात होती. कालांतरानं नायक यांना एसीबीनं अटक केली. या साऱ्यातून सुटल्यानंतर २०१२ मध्ये त्यांची अतिरिक्त पोलिस आयुक्त (पश्चिम) नियंत्रण कक्षात नियुक्ती करण्यात आली.
संबंधित बातम्या