Bhakti Kumbhar : पुण्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी रात्री ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या कारवर हल्ला केला. या हल्ल्याच्या वेळी एक तरुणी या कार्यकर्त्यांना सामोरी गेली आणि हल्लेखोरांना प्रतिकार केला. भक्तीचं सध्या जगभरातून कौतुक होत आहे. सोशल मीडियात तिच्या नीडरपणाचं कौतुक होतंय.
या तरुणीचं नाव भक्ती कुंभार आहे. भक्ती ही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाची पुणे शहर उपाध्यक्ष आहे. निखिल वागळे यांच्या कारवर हल्ला झाल्याचं समजताच तिनं सहकाऱ्यांसोबत तिथं धाव घेतली व हल्लेखोरांचा प्रतिकार केला. महिलांना हात लावू नका असं ती ओरडत होती. हल्ला होत असताना ती पोलिसांकडं मदत मागत होती. मात्र, कुणीही मदत न केल्याचं तिचं म्हणणं आहे.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भक्तीच्या धाडसाचं कौतुक केलं आहे. तिच्या धाडसामुळं गाडीतील निखिल वागळे आणि असीम सरोदे सुरक्षित राहिले. तिचं धाडस कौतुकास्पद आहे. पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत असताना प्रसंगावधान राखून भक्ती व तिच्या सहकाऱ्यांनी जे केलं, त्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. रोहित पवार यांनीही पोस्ट करत भक्तीताई व सहकाऱ्यांचा आम्हाला अभिमान आहे, असं म्हटलं आहे.
अॅमस्टरडॅम विद्यापीठातील युरोपीयन स्टडीज विषयाच्या प्राध्यापक सुधा राजगोपालन यांनीही भक्ती व तिच्या सहकाऱ्यांचं कौतुक केलं आहे. हिंदुत्ववादी गुंडांना रोखण्यासाठी कारच्या बाजूनं धावणाऱ्या त्या महिलांबद्दल मला आदर आहे, असं सुधा राजगोपालन यांनी म्हटलं आहे.
मोदी सरकारच्या कारभारामुळं देशातील लोकशाही धोक्यात आली असून घटनात्मक संस्थाही निष्प्रभ झाल्या आहेत, असा आरोप करत, निखिल वागळे यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी 'निर्भय बनो' आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून पुण्यातील प्रसिद्ध वकील अॅड. असीम सरोदे, सामाजिक कार्यकर्ते विश्वंबर चौधरी व निखिल वागळे हे ठिकठिकाणी सभा घेत आहेत.
या सभांमधून वागळे व इतर वक्ते पंतप्रधानांवर टीका करतात. प्रभू रामचंद्रांबद्दल बोलतात असा भाजपचा आक्षेप आहे. लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न दिल्यानंतर वागळे यांनी आडवाणी यांच्यावरही टीका केल्याचा भाजपचा आरोप आहे. त्यामुळं पुण्यात वागळे यांच्या भाषणाला भाजपचा विरोध होता. हा विरोध धुडकावून निखिल वागळे हे काल पुण्यात सभा घेण्यासाठी गेले होते. तेव्हा भाजपच्या लोकांनी त्यांच्या कारवर हल्ला केला.